Rupali Chakankar breaks silence on anonymous letter controversy and Ashok Kharat case allegations : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण बाहेर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच पक्षाअंतर्गत आणि विरोधकांकडून दबाव वाढू लागल्यानंतर त्यांना पक्षाच्या महिला संघटनेचे प्रमुखपदही सोडावे लागले. या प्रकरणात सातत्याने राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या दरम्यान काही दिवसांपूर्वी बीडमधून एक निनावी पत्र पोलिस प्रशासनाला मिळाले होते. या पत्रात महिला आयोगाच्या कार्यालयाचा उल्लेख करत गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या आपली भूमिका मांडली आहे.
चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
“महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र आज २८ दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले,” असे चाकणकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
निनावी पत्राच्या मागे कोण आहे? असा प्रश्नही पुढे चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, “तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले, हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य” होते हे समोर आले पाहिजे.”
या निनावी पत्राची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. “बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे,” असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
इतकेच नाही तर चाकणकरांनी त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत, अखेर सत्य समोर येईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, “यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे.केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय, बदनाम केले जात आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे.”
“तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे,” असेही चाकणकरांनी स्पष्ट केले आहे.
