Rupali Chakankar Resignation : अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आले होते. या प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेलाही रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्याबाबतही रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ हा ६ वर्षांपूर्वीचा असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच शिवनिका संस्थानातील माझ्या सदस्य पदाचा कार्यकाळ २०२५ मध्येच संपलेला असल्याचंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
“शिवनिका संस्थानात मी सदस्य म्हणून काम केलं आहे. माझ्यासह अनेक मान्यवर देखील त्या संस्थेवर सदस्य होते. मात्र, या संस्थानच्या सदस्यपदाचा माझा कार्यकाळ ८ ऑगस्ट २०२५ रोजीच संपलेला आहे. समाजात जीवन जगत असताना आपण कोणाला ना कोणाला गुरू मानत असतो. खरात पती-पत्नीला माझ्या कुटुंबाने गुरु मानलं, मी गुरु मानलं. त्या ठिकाणी होणारे कार्यक्रम, मग ते महाशिवरात्रीचे असतील किंवा गुरुपौर्णिमेचे असतील, या निमित्ताने आम्ही उपस्थित राहत होतो”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
“आता माध्यमांमध्ये सातत्याने दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त अनेकजण पाद्यपूजा करतात, तसं आम्हीही ती पाद्यपूजा केली होती. पाच ते सहा वर्षांपूर्वी आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, पण सहा वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसते. आज आपण ज्यांच्याबरोबर आहोत, पण उद्या तेच कसे वागतील ही कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे मला जेव्हा ही घटना समजली तेव्हा मलाही धक्का बसला. खरातच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मला काही माहिती असण्याचं कारण नव्हतं. या संपूर्ण प्रकरणाबाबत मी पोलीस महासंचालकांना पत्र दिलं असून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
