Sushma Andhare Captain Ashok Kharat Rupali Chakankar Case: आज (२० मार्च) रोजी सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यात असा दावा करण्यात आला आहे की चाकणकर यांनी स्वतःचे बोट कापले होते. अंधारे यांनी सांगितले की चाकणकर यांनी अनामिका म्हणजेच डाव्या/उजव्या हाताच्या करंगळीशेजारील बोट कापले होते. याचे सर्व फोटो अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बोट कापले!
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या मजकुरात अंधारे म्हणाल्या की हे फोटो एका पीडित महिलेनेकडून मिळालेले स्क्रिनशॉट्स आहेत. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, चाकणकर तंत्र मंत्र विद्या जाणत होत्या. विशिष्ट दिवशी जर अनामिका (करंगळीच्या शेजारील बोट) कापली गेली आणि ज्या व्यक्तीवर तंत्र मंत्र करायचे आहे त्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या बाहुलीवर रक्त सांडले, तर सूर्य (यश) आणि शुक्र (आकर्षण) हे दोन्ही ग्रह अनुकूल होतात आणि आशीर्वाद देतात, असा समज आहे.
सोमवती अमावस्या आणि जखम
पुढे अंधारे म्हणाल्या की, या फोटोतील तारखा नीट पाहिल्यास लक्षात येते की पहिला फोटो साधारण ९ सप्टेंबर २०२४ रोजीचा आहे, ज्याची जखम मोठी दिसते. ही जखम सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत दिसत राहते, परंतु स्वयंपाकघरात झालेली जखम तीन-चार महिने टिकू शकत नाही. ९ सप्टेंबरच्या आसपास काही विशेष होते का हे तपासल्यास, २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्या होती, असे पंचांगानुसार कळते. अंधारे यांनी या प्रकरणाचा गंभीर तपास संबंधित अधिकाऱ्यांनी करावा, असेही सांगितले.

अंधारे यांनी केलेल्या मागण्या:
१. रुपाली चाकणकर यांना ताब्यात घेऊन अटक करावी.
२. संबंधित प्रकरणी त्यांची समोरासमोर चौकशी करावी.
३. त्यांची नार्कोटिक्स (नार्को) टेस्ट केली जावी.

खरातांची भाची चाकणकरांच्या घरी
गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील महिलांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे. अंधारे म्हणाल्या की, खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर उपस्थित होत्या; तसेच, खरातांची भाची चाकणकरांच्या घरी राहते. खरात आणि चाकणकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाले असून त्याची कागदपत्रे अंधारे दोन दिवसांत सादर करणार आहेत.

“चाकणकरांकडून पदाचा गैरवापर”
तसेच यापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनीही आरोप केले आहेत की खरात यांचे चाकणकरांशी संबंध आहेत. रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्या सध्या फरार असून, पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ पदमुक्त केले जावे, अन्यथा राज्यातील महिलांचा महिला आयोगावरचा विश्वास ढासळेल.

गेल्या काही दिवसांत कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आज अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत चाकणकरांना अटक करण्याची मागणी केली. तसेच त्यांची नार्को टेस्ट करावी, अशीही मागणी केली.
