Rupali Chakankar Finger Injury Update : अघोरी कृत्य करण्याकरता रुपाली चाकणकर यांनी त्यांची अनामिका कापली होती, असा दावा राजकीय नेत्यांकडून केला जातोय. या संदर्भातील फोटोही सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर पूरत्या अडकलेल्या असताना त्यांच्यावर अघोरी कृत्याचा आरोपही केला जात असल्याने आता त्यांना वाचवण्याकरता त्यांचे समर्थक पुढे आले आहेत. एका मंडळाच्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या असताना रुपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत झाली, त्या मंडळातील कार्यकर्त्यांनीच आता एक व्हिडिओ बनवून संबंधित घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.
आरतीला आलेल्या असताना बोटाला लागलं
विघ्नहर्ता मित्रमंडळाचा अध्यक्ष मयूर दुधाणे म्हणाला, “प्रत्येकवर्षी ताई आमच्याकडे आरतीला येतात. त्यादिवशीही आरतीचं नियोजन होतं. आम्ही ताईंना घ्यायला वर गेलो होतो. गाडीतून उतरताना ताईंचं बोट अडकलं. त्यामुळे ताईंच्या बोटातून रक्तस्राव सुरू झाला. तेव्हा त्यांनी बोटाला टीश्यू पेपर लावला आणि त्या आरतीला आल्या. मंडळाच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिमध्येही दिसेल की ताई टिश्यू पेपर लावून आरतीला आल्या होत्या. त्यानंतर ताईंचा सत्कार केला. तिथेही त्यांच्या हाताला जखम दिसेल.”
“आता त्यांचा फोटो दाखवून ध चा म केला जातोय. कोणतीही माहिती नसताना फेसबुकवरील फोटो घेऊन चुकीचा अर्थ लावला जातोय. अंधश्रद्धा पसरवली जातेय. त्यामुळे चुकीचा मेसेज फिरतोय. जो प्रकार घडतोय, त्याची शहानिशा केली पाहिजे. आम्ही या घटनेचा निषेध करतो”, असंही मयूर दुधाणे म्हणाला.
ताईंचा चेहरा पडला होता, डोळ्यांत पाणी होतं
तसंच, सचिन उत्तेकर म्हणाले, “९ सप्टेंबर रोजी ताई आरतीला आल्या होत्या. ताईंचा चेहरा पडलेला दिसत होता. त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. मी त्यांना विचारलं ताई तुम्हाला काय झालंय? तर त्या म्हणाल्या की माझ्या बोटाला लागलं आहे आणि प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे मी त्यांना म्हणालो की चला घरी जाऊ, तिथे तुम्हाला पाणी देतो. त्यानुसार त्या माझ्या घरी आल्या. त्यांना पाणी दिलं. तिथून त्या दवाखान्यात गेल्या.”
अघोरी कृत्याबाबत चर्चा सुरू आहे. पण ताई ३६ जिल्ह्यांत फिरून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांच्यावर असे आरोप केले जात आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो, असंही ते म्हणाले.
अंधारे आणि ठाेंबरे बाईंकडून चुकीचा आरोप
“अंधारे आणि ठोंबरे बाईंनी असा आरोप केलाच नाही पाहिजे. ताईंवर चुकीचा आरोप केला जात आहे. रक्त येत असतानाही ते आमच्या मंडळाची आरती केली आणि मग त्या हॉस्पिटलला गेल्या”, असं एक महिला म्हणाली.
