Rupali Chakankar : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. या अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. मात्र, याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाबाबत आता रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहित उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलं?

“आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्यावतीने पत्र दिलं. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले आहेत”, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

अशोक खरातप्रकरणी सुनील तटकरेंनी काय म्हटलं?

“नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल. उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू”, असं सुनील तटकरे यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अशोक खरात प्रकरणावर प्रफुल पटेल यांचं मोठं वक्तव्य

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याबरोबर अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्या अशोक खरातच्या पाया पडताना, पाद्यपूजन करताना, छत्री धरताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका होत असून त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, “अशोक खरात प्रकरणी निश्चित कारवाई केली जाणार आहे. या तपासणीतून आणि चौकशीतून ज्यांची नावे समोर येतील त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचीही नावे जोडली गेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून योग्य ती कारवाई करू. येणाऱ्या एक-दोन दिवसांत हे करू.”