Ashok Kharat Rupali Chakankar News: कॅप्टन अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खरातसोबत चाकणकर यांचे काही फोटोही चर्चेत आहेत.
दरम्यान, २० मार्च रोजी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते. या सर्व घडामोडींनंतर शुक्रवारी उशिरा रात्री चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
“खरातचे हे दुसरे रूप मला माहित नव्हते”
राजीनाम्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “खरातचे हे दुसरे रूप मला माहित नव्हते. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.” त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचेही स्पष्ट केले. तसेच “मी माझे कोणतेही बोट कापलेले नाही. सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
“राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा”
दरम्यान, विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना “राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा” अशी टीका केली. ते म्हणाले की, वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही! स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे! म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर, पत्रकारांवर टाकलेला दबाव, या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद, चूक झाली अस त्यांना वाटत नाही!”
राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 20, 2026
स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे!
म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर,पत्रकारांवर टाकलेला… pic.twitter.com/NFGlrLXfvJ
“चाकणकर हा केवळ छोटा मासा”
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, “रुपाली चाकणकर हा केवळ छोटा मासा आहे. या प्रकरणात आणखी कोणते मंत्री किंवा नेते सहभागी होते, कोणी खरातला राजाश्रय दिला, याची सखोल चौकशी होऊन सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.”
राजीनामा घेऊन हे प्रकरण संपणार नाही
खासदार वर्षा गायकवाड यांनीही चाकणकर यांच्यावर टीका करत म्हटले की, “महिला आयोगाच्या अकार्यक्षम अध्यक्षा म्हणूनच रुपाली चाकणकर लक्षात राहतील. त्यांनी महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना अधिक अडचणीत आणले. मुख्यमंत्री सांगितल्यावरच त्यांना राजीनामा द्यावा लागला, यावरून त्यांची कार्यपद्धती स्पष्ट होते.” गायकवाड पुढे म्हणाल्या, “चाकणकर यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण संपणार नाही. खरातला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. तेव्हाच पीडित महिलांना न्याय मिळेल.” या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
