Rupali Chakankar Resignation news updates regarding Captain Ashok Kharat rape case: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात आता शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे. चाकणकर यांनी कॅप्टन खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्याच्यासाठी छत्री घेऊन उभ्या असल्याचाही फोटो समोर आला आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

“कॅप्टन खरातची वरात निघाली आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या पेनड्राईव्हमध्ये ५६ व्हिडीओ मिळाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भोंदू बाबांचे पाय धुताना एका व्हिडीओत दिसत आहेत. अशावेळी त्या इतर महिलांना काय न्याय देणार?” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलत असताना उपस्थित केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, “चाकणकर यांचा अंधश्रद्धेवर आणि भविष्यवाणीवर विश्वास आहे, अशा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून राज्यातील महिलांनी कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? कॅप्टन खरात याने महिलांचे शोषण केल्याची माहिती मिळत आहे. अशा भोंदुबाबांचा सुळसुळाट दिसत आहे.”

“काही राजकीय पुढारी कर्तुत्वाने मोठे होण्यापेक्षा भविष्य पाहून मोठे होण्याची स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होईल की अधोगती होईल, असा प्रश्न पडतो. अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनींकडून राज्यातील भगिनींना न्याय मिळेल का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांना (चाकणकर) राज्य महिला आयोगाच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे”, अशी आमची मागणी असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

कोण आहे कॅप्टन अशोक खरात?

संशयित अशोक खरातची नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे श्री शिवानिका संस्थान नामक संस्था आहे. या संस्थानच्या कार्यकारी मंडळात रुपाली चाकणकर यांचा समावेश असल्याची यादी अंधारे यांनी प्रसारित केली आहे. तसेच या ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता, अशीही माहिती समोर येत आहे.

अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या अघोरी पूजा करणे, स्वत:च्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग केल्याची चर्चा आहे.