Rupali Chakankar Resignation: अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या खरातच्या श्री शिवनिका संस्थानमध्ये विश्वस्त आहेत. तसेच खरातचे पाद्यपूजा करताना, त्याच्यावर छत्री धरतानाचे चाकणकर यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आणि त्यांच्याच पक्षातील नेत्यांनीही केली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी लोकसत्ताला दिली आहे.
अशोक खरात प्रकरण चर्चेत आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अशोक खरातच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती नसल्याचे म्हटले होते. तसेच गेल्या दोन दिवसांपासून आरोपांची राळ उडत असताना रूपाली चाकणकर या सार्वजनिक मंचावर दिसल्या नव्हत्या. १८ मार्च रोजी त्यांनी पहिल्यांदा या प्रकरणावर सोशल पोस्टच्या माध्यमातून भाष्य केले. त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली असल्याचे म्हटले आहे.
“शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे”, असे सांगून चाकणकर यांनी या प्रकरणापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.
मुख्यमंत्री दोन आठवड्यांपासून नजर ठेवून?
भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती उघड होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणात कारवाई करण्याच्या दृष्टीने लक्ष घातले होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने खरातविरुध्द कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. आधी पुरावे हाती आल्यानंतर लगेचच पोलिसांनी खरातविरुध्द कारवाई केली. या प्रकरणात महत्त्वाच्या चित्रफिती आणि काही माहिती आधीच पोलिसांनी ताब्यात घेतली होती, अशी चर्चा आहे.

अशोक खरातवर तीन गुन्हे दाखल
अशोक खरात याच्यावर महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी खरात याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसची तपासणी केली असता एक पिस्तूल, काही संशयास्पद कागदपत्रे, काडतुसे सापडले आहेत. खरातविरुद्ध सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात अश्लील चित्रफित समाज माध्यमात टाकण्याची धमकी आणि पाच कोटींची खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरुन तसेच शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील छायाचित्र समाज माध्यमात टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे अशोक खरात?
सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी हे अशोक खरातचे मूळ गाव. खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. तो स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेतो. खरातने अंकगणित तसेच ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) चे शिक्षण घेतले असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर खरातने वावीजवळील मिरगाव शिवारातील शेतीत श्री शिवनिका संस्थान अंतर्गत ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली.
