सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना केली होती. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनीही संजय शिरसाट यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ठाकरे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षात घेतल्या दीडशे बैठका; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

काय म्हणाल्या रुपाली पाटील?

“संजय शिरसाटच नव्हे, तर शिंदे गटाचे प्रत्येक आमदार महिलांविषयी काहींना काही आक्षेपार्ह बोलत असतात. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबाबत जे विधान केलं आहे, त्याचा एक महिला म्हणून मी निषेध करते. सुषमा अंधारे या राजकारणात पुरुषांना दादा-भाऊ म्हणतात. यातून त्यांचे संस्कार दिसतात. पण त्यांच्या विषयी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, त्यातून संजय शिरसाटांवरचे संस्कार दिसतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून राहायची त्यांची लायकी नाही”, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडून काय तुमच्या मांडीवर…?” संजय राऊत यांचा भाजपाला तिखट प्रश्न

“एखाद्या महिलेने तुम्हाला दादा म्हटलं त्यात वाईट काय? दादा म्हणणं चुकीचं आहे का? दादा-भाऊ म्हटलं तर लफड्याचा विषय येतो कुठं? तुम्हाला बहिण-भावाचं नातं दिसत नाही का? ज्या महिला नंगानाच करतात, त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. पण ज्या महिला राजकारणात काम करताना चौकटीत राहून बोलतात, त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानं केली जातात. मुळात अशी लोक सत्तेत असणं हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवण्याची शक्यता, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार दाखल; म्हणाल्या, “या विकृत आमदाराने…”

“जेंव्हा शिरसाटांनी हे विधान केलं. तेव्हा त्यांच्या घरातल्या लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की संजय शिरसाट यांची नजर घाण आहे. पण आम्ही भर सभेत याबद्दल बोललो नाही. कारण आम्ही मर्यादेत राहून बोलतो”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का! महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने दोन वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी दक्षिण मुंबईतील एका इमारतीच्या ७२ व्या मजल्यावर संजय शिरसाटांचा फ्लॅट आहे, असा दावा त्यांनी केला. मला आमदार शिरसाटांना विचारायचं आहे, दक्षिण मुंबईत ७२ व्या मजल्यावर तुम्ही कोणासाठी फ्लॅट घेतला होता. गुवाहाटीवरून परत आल्यानंतर तुम्हाला जी खोकी मिळाली, त्यापैकी पाच खाके कोणाला दिले होते? का तुम्ही संभाजीनगरमधील पाटील नावाच्या व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न करत होता, असे त्या म्हणाल्या.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.” असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali patil criticized sanjay shirsat after statement on sushma andhare spb
First published on: 28-03-2023 at 14:03 IST