Rupali Chakankar vs Rupali Thombare Patil: “रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहिल्यास अशोक खरात प्रकरणाचा तपास व्यवस्थित होणार नाही. तसेच, चाकणकर १०० टक्के पुरावे नष्ट करतील”, अशी शंका उपस्थित करत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रुपाली चाकणकर यांनीच खरातला अभय दिल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप

रुपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर आणि भोंदूबाबत अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप केले. चाकणकरांना सहआरोपी करुन याप्रकरणाशी निगडीत सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. “महिला आयोगाच्या अध्यक्षांचे असलेले पाठबळ यामुळेच अशोक खरात या भोंदू बाबाची हिम्मत वाढल्याचा आरोप पाटील यांनी केला. अशा पाठिंब्याशिवाय खरातच नव्हे कुठल्याच गुन्हेगाराची हिम्मत वाढणार नाही. शिवाय यात आणखी कोणाचे राजकीय हस्तक्षेप आहेत का? याचाही तपास करण्याची गरज आहे”, असे ठोंबरे – पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

५८ व्हीडीओ

भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी निगडीत समोर आलेल्या एका व्हिडीने एवढी खळबळ निर्माण झाली आहे. असे ५८ व्हीडीओ आहेत, त्यामुळे हे खूप मोठे प्रकरण असल्याचे त्यांनी नमूद केले. “वर्षभरापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे अशोक खरातची राज्य महिला आयोगाने चौकशी करायला हवी होती. तसेच, संबंधित महिलेची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करायला हवा होता. यामुळे ५८ महिला या अत्याचाराला बळी पडल्या नसत्या,” असे ठोंबरे पाटील म्हणाल्या.

आंदोलनाचा इशारा

पोलिसांनी सर्व ५८ व्हिडीओ माध्यमांना देणं आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदमुक्त करणे गरजेचे आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांची खूप मोठी नाच्चकी आणि बदनामी झाली आहे, असे पाटील म्हणाल्या. चाकणकर संविधानिक पदावर असल्याने प्रकरणाचा तपास व्यवस्थित होणार नाही, अशी भीतीही ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केली. याप्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.  या प्रकरणावर कोणी दबाव आणत असेल तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला. 

म्हणून अजित पवारांनी राजीनामा मागितला होता – पाटील

चाकणकर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असल्याने निश्चित बदानामी होत आहे. बदनामी होऊ नये म्हणूनच त्यांनी राजीनामा मागितला होता. पण, पक्षामध्ये पण काही नेते आहेत त्यांच्यावर देखील खरातच्या माध्यमातून वशीकरण करण्यात आलंय असं वाटंत, आणि म्हणून तो राजीनामा होत नाही. येत्या काळात राजीनामा होत नाही म्हणून प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची नावे समोर येतील. कारवाई करु नये म्हणून पोलिसांना फोन करणाऱ्या नेत्यांची नावे देखील समोर आणणार, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

महिला सुरक्षेचा विषय

हा विषय कोणत्याही जातीचा, पक्षाचा किंवा पंथाचा नाही. हा विषय महाराष्ट्रातील महिला सुरक्षा आणि सक्षमतेचा असल्याचेही पाटील म्हणाल्या. हे प्रकरण स्थानिक वृत्तपत्राने उघडकीस आणले होते पण, रुपाली चाकणकर यांनी वृत्तपत्राच्या संपादकाला जबरदस्तीने माफी मागण्यास सांगितले, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.