scorecardresearch

“तडीपार असलेले अमित शाह गृहमंत्री झाले तर…”; राज ठाकरेंना रुपाली ठोंबरे पाटलांचं प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांना रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.

पाडव्याच्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील मंत्री तुरुंगात असल्यावरून टीका केली होती. छगन भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात राहून आले, त्यांना राष्ट्रवादीने मंत्री बनवलं, ते स्वातंत्र्यसेनानी नाहीत. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक देखील तुरुंगात आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला होता. या आरोपांना पूर्वी मनसेत असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

शरद पवार जातीचं राजकारण करतात; राज ठाकरेंच्या आरोपांवर रुपाली पाटील म्हणाल्या, “राष्ट्रवादीत जातीवाद…”

यावर प्रत्युत्तर देताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “अमित शाह जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तडीपार आणि जेलमध्ये होते. परंतु तरीही आज ते भारताचे गृहमंत्री आहेत. छगन भुजबळ तुरुंगात होते मात्र ते निर्दोष मुक्त झाले आहेत. भाजपाला विकासाचा विषय नसल्याने जातीय तेढ वाढवण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करून ते इतर पक्षांच्या नेत्यांना बोलायला भाग पाडत आहेत,” असा आरोप रुपाली पाटलांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केला.

“राज ठाकरे फायरबँड नेते, पण ईडी…”; रुपाली ठोंबरे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांना रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी भोंगे लावता येणार नाही, असा आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी नक्कीच झाली पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राज्यात भाजपाची सत्ता असताना म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिला होता. त्यावेळी त्या निर्णयाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही. आता ते हा मुद्दा काढत असतील तर जाणीवपूर्वक ते या सगळ्या गोष्टी करत आहेत, हे सिद्ध होतंय. तसेच हिंदुंना हनुमान चालिसा किंवा भोंगे वाजवायला कोणीही नाही म्हटलेलं नाही. परंतु कायद्याने गुन्हा आहे तो आहे, मग तो कोणीही केला असूदेत, त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं,” असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rupali thombare patil slams raj thackrey saying amit shah was tadipar but he is home minister of country hrc