Rupali Thombre Patil : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीच्या सकाळी विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जानेवारीला निरोप देण्यात आला. अजित पवार हे लोकनेते होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी अजित पवारांचा मृत्यू घात होता की घातपात? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांची पोस्ट नेमकी काय?

मा.अजित दादांच्या अचानक जाण्याने बधिर झालो, कसे झाले का झाले काहीच कळत नाही. देवाने लाखोच्या पोशिंदा नव्हता न्यायचा आमच्या सारखे न्यायचे होते अत्यंत अघटीत घडले.आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील,पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे. राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत. फ्लाइट ८ वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांचा एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया, या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही? याची चौकशी होणे गरजेचे कारण घात की अपघात? #Transparency #AviationSafety अशी पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर केली आहे.

Rupali Thombre Patil Post
रुपाली ठोंबरे पाटील यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे? (फोटो-फेसबुक पेज, रुपाली ठोंबरे पाटील)

२८ जानेवारीला अजित पवारांचा अपघात कसा झाला?

बुधवारी (२८ जानेवारीला) सकाळी बारामतीत विमान कोसळून अजित पवार यांचे निधन झाले. मुंबईहून अजित पवार विमानाने बारामतीला निघाले होते. बारामतीला येत असतानाच विमान कोसळलं आणि अपघात झाला. या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते, नागरिकांनी बारामतीत गर्दी केली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नागरिकांची रीघ लागली होती. गुरुवारी सकाळी काटेवाडी येथे अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. काटेवाडी येथे दादांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नागरिकांची रीघ लागली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही कुटुंबीयांसह काटेवाडीत अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.