अहिल्यानगर : ग्रामपंचायत कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथील सरपंच आनंदा गोरक्षनाथ वाघ यांनी दाखल केलेले अपील ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी फेटाळले असून, विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांनी दिलेला अपात्रतेचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.श्री. वाघ यांनी आपल्या अपीलमध्ये विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध आव्हान दिले होते. मात्र, सुनावणीदरम्यान महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अहवालात नमूद झालेल्या तथ्यांनुसार, सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी श्री. सोपान दगडू भापकर यांच्या मालकीच्या गट क्रमांक २८० मध्ये अनधिकृत मुरूम वाहतूक व टाकून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशात नमूद आहे.
महसूल अधिकाऱ्यांनी या कृतीबद्दल श्री. वाघ यांच्यावर १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड आकारला होता. त्यावरील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, विभागीय आयुक्त अपिले यांनी कायम ठेवलेली आहेत. त्यामुळे ग्रामविकास मंत्र्यांनीही हा दंड व गैरवर्तनाचा आरोप वैध ठरवत सरपंचपदासाठी त्यांना अपात्र घोषित केले आहे.
मंत्र्यांच्या आदेशात म्हटले आहे की, सरपंच म्हणून श्री. वाघ यांनी आपली प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना कर्तव्यात दुर्लक्ष व नियमबाह्य वर्तन केले आहे. त्यांचे वर्तन अशोभनीय व बेजबाबदार असल्याने ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) नुसार ते कारवाईस पात्र आहेत. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
