‘उगम फाऊंडेशन’च्या विविध योजना

सांगली : ग्रामीण विकास आणि शेतीला व्यावसायिक रूप देण्याच्या ध्येयाने सांगलीतील ‘उगम फाऊंडेशन’ कार्यरत आहे. तीस वर्षापूर्वी महाविद्यालयीन तरुणाईच्या हाताला विधायकतेची जोड देत ‘बळीराजा स्मृती धरण’ बांधण्यात आले. आता शेती, सिंचन, पशुपालनापर्यंत आणि अगदी ओसाड माळावरच्या ‘क्रांती स्मृती वना’पर्यंत संस्थेची घोडदौड सुरू आहे. संस्थेला कार्यविस्तारासाठी मदतीचे हात हवेत आहेत.

खानापूर तालुक्यातील बलवडी या येरळा नदीकाठच्या गावालाही दुष्काळाच्या झळा कायमच्याच. गावातील पुरोगामी चळवळीतील  संपतराव पवार यांनी गावच्या विकासाचे स्वप्न पाहिले. केरळच्या लोकविज्ञान संघटनेने सादर केलेल्या वैज्ञानिक प्रयोगाने प्रभावित होऊन १९८५ मध्ये विज्ञानाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. नदीपात्रातील वाळूचे शासकीय स्वामित्व शुल्क भरून व्यवसायाची जोड दिली. यातून मिळालेले पैसे आणि विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी,गावकरी यांच्या श्रमदानातून राज्यातील पहिले ‘बळीराजा स्मृती धरण’ बांधण्यात आले. आज या धरणातून ३५० हेक्टर क्षेत्राला संरक्षित पाणी मिळत आहे.

क्रांती स्मृती वन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. क्रांर्तिंसह नाना पाटील यांच्यामुळे स्वातंत्र्यचळवळीत अग्रेसर असलेला हा भाग, घरटी एक तरूण या चळवळीत सहभागी असायचा. स्वातंत्र्य चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांचा धगधगता इतिहास भावी पिढीला समजावा यासाठी दृक-श्राव्य माध्यमातून क्रांती स्मृती वनाची उभारणी सध्या करण्यात येत आहे. देशभरातील २०० हुतात्म्यांची नावे वृक्षांना देऊन त्या त्या झाडाखाली गेल्यानंतर त्याचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान ऐकण्याची व अनुभवण्याची व्यवस्था केली जात आहे.

संस्थेने दुष्काळी भागातील जनावरांसाठी पहिले निवारागृह उभे केले. हिवतडच्या डोंगराळ भागात श्रमदानातून र्डांळब उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळच येणार नाही अशी व्यवस्था गावकऱ्यांच्या सहभागाने करायची आहे. यासाठी शेतीमध्ये वेगळे प्रयोग, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा ‘उगम फाउंडेशन’चा मानस आहे.