एसटी संप: “लडने को तुम और भाषण को हम”; आंदोलकांना चिथावणी देत असल्याचा शिवसेनेचा भाजपावर आरोप

१२ आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपाने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

ST worker who was under stress due to the strike died of a heart attack in Satara
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं, या मागणीसाठी गेल्या साधारण दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत.

एसटीच्या संपाला आता जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. या संपाच्या अनुषंगाने विरोधी पक्षानेही सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. यावरुनच शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकर होणं तूर्त शक्य नाही हे विरोधी पक्षालाही माहित आहे, कामगारांनीही सत्य स्वीकारलं आहे. पण भाजपा नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी झाली असल्याची टीका शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून केली आहे.

१२ आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपाने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे. दहशत , ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर चर्चा वगैरे होऊन इतरही प्रश्न भविष्यात मार्गी लागतील. तरीही भारतीय जनता पक्षातले लोक संपास चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे.

हेही वाचा – एसटीचे खासगीकरण ? ; चाचपणीसाठी महामंडळाकडून खासगी संस्थेची नियुक्ती

साताऱ्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. सातारा आगारातून एस.टी. बस बाहेर काढणाऱ्या चालकांना भाजपा समर्थकांनी हाणामारी केली. अशा घटना आता अन्य ठिकाणी घडू लागल्या आहेत. हे भाजपाचे वैफल्य म्हणायला हवे. मुंबईतील आझाद मैदानावर एस.टी. कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या ठिय्या आंदोलनात भाजपाचे नेते घुसतात व शेवटपर्यंत लढण्याच्या गर्जना करून आपापल्या घरी आरामात झोपतात. कर्मचारी मात्र तेथे मच्छर, दगडधोंड्यांच्या सहवासात बसून आहेत. त्या ठिय्या आंदोलनात भाजपानेही सात-आठ दिवस पथारी पसरली आहे असे दिसत नाही. म्हणजे ‘लडने को तुम और भाषण को हम’ असेच त्यांचे चालले आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला आहे.

काही कामगारांनी यादरम्यान मरणास कवटाळले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कामगार मृत्यूप्रकरणी राज्याच्या परिवहन मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ”सरकार किती निष्पाप एस.टी. कर्मचाऱ्यांचे बळी घेणार?” असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी विचारला आहे. हाच ‘समान नियम किंवा कायदा’ मानायचे ठरवले तर दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यात वर्षभरात पाचशेहून जास्त शेतकऱ्यांनी बलिदान केले. त्याबद्दल नक्की कोणाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हेसुद्धा आता जनतेला कळू द्या, असा प्रतिहल्ला शिवसेनेने चढवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saamna editorial about st protest blames bjp vsk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या