छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली. ते एबीपी माझा वृत्तावाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा – “संभाजीनगरच्या घटनेचे देवेंद्र फडणवीस मास्टमारईंड”, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “एमआयएम…”




काय म्हणाले पोलीस आयुक्त?
“काल रात्री ११च्या सुमारास किराडपुरा भागातील राम मंदिराजवळ तरुणांच्या दोन गटांत किरकोळ भांडण झालं. त्यानंतर एका गटातील तरुण निघून गेले. मात्र, काही वेळात या ठिकाणी गर्दी जमा झाली. पोलिसांनी या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या एका तासानंतर मोठ्या संख्येने लोक जमायला लागली आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केली”, अशी माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “दगडफेक सुरू झाल्यानंतर पोलिसांवर ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजकंटकांची संख्या जास्त असल्याने पोलिसांना त्यांना रोडवर थांबवणं शक्य झालं नाही.”
“घटनेची माहिती कंट्रोल रुमला मिळाल्यांनंतर माझ्यासह काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आम्ही पोलीस बळाचा वापर करून तो जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. एकदीड तास हा सर्व प्रकार सुरू होता. यावेळी जमावाने मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगड फेकले. पोलिसांच्या आणि काही खासगी गाड्या त्यांनी जाळल्या. पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली”, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा – “माझ्यावरही दगडफेक झाली”, इम्तियाज जलील यांनी सांगितली आपबिती, म्हणाले, “पोलिसांना…”
दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पोलीस उशीरा पोहोचल्याचा आरोप केला. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अशावेळी नेमकी परिस्थिती काय आहे? ने समजून घेणं गरजेचं असतं. काल समाजकंटकांनी या भागातील लाईट फोडल्याने अंधार झाला होता. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊनच आम्ही कारवाई केली”, असे ते म्हणाले.
“याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करण्यात येईल”, असेही त्यांनी सांगितलं.