Maharashtra Budget Session 2026 : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान विविध विषयांवरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची आज विधानभवनाच्या परिसरात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात जोरदार वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन्ही आमदारांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसत आहे. मात्र, हा वाद नेमकं का झाला? याचं कारण समोर आलं नसलं तरी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षाबाबत बोलताना भाषा व्यवस्थित वापरली नसल्याचा आरोप केला आहे.

नेमकं काय घडलं? व्हिडीओत काय?

“तुम्ही बाप का काढायला लागलात? तुम्हाला बाप काढायचा अधिकार आहे का?”, असं सचिन कल्याणशेट्टी यांनी भास्कर जाधव यांना म्हटलं.त्यावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणतात की, “हो आहे.” त्यावर सचिन कल्याणशेट्टी हे भास्कर जाधवांना म्हणतात की, “तुम्ही जेष्ठ सदस्य आहात. शांततेत बोला ना, वाद का करता? आणि बाप का काढायला लागलात? बाप नाही काढायला पाहिजे”. त्यावर पुन्हा भास्कर जाधव म्हणतात की, “तुम्ही एवढ्यावर थांबा आणि मी देखील एवढ्यावर थांबतो. पण तुम्ही जर पुन्हा तेच तेच बोलणार असाल तर मी बाप काढणार”, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. त्यानंतर सचिन कल्याणशेट्टी यांनी पुन्हा म्हटलं की, “तुम्ही आमचा बाप काढला तर आम्ही तुमचा बाप काढणार.” दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार भास्कर जाधव यांच्याचील या वादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सचिन कल्याणशेट्टी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

“मी सभागृहात जात असताना भास्कर जाधव हे एका कर्मचाऱ्याबरोबर वाद घालत होते. भास्कर जाधव हे एका कर्मचाऱ्याबरोबर वाद घालत असताना असं म्हणत होते की ही व्यवस्था काय सत्ताधारी पक्षाच्या बापाची आहे का? तेव्हा मी त्यांना सांगत होतो की तुम्ही जेष्ठ सदस्य आहात, सभागृहाच्या बाहेर लोकांना अशा पद्धतीने बोलू नका. सत्ताधारी पक्षाचा बाप काढू नका आणि तुम्ही तसं बोललात तर आम्हीही बोलू. पण महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह आहे, तेथे अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही, हेच भास्कर जाधवांना मी समजावत होतो. मात्र, भास्कर जाधव हे काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. कदाचित त्यांना जे अपेक्षित होतं विरोधी पक्षनेता पद. पण ते त्यांना मिळत नसल्याने ते व्यथित झालेले असावेत”, असं सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटलं आहे.

“राजकारणात काही वैचारिक मतभेद असतात. मात्र, असं असलं तरी कोणाच्या पक्षाचा बाप काढण्याची आणि अशा पद्धतीने बोलण्याची संस्कृती महाराष्ट्रात नाही. त्यामुळे मी हीच विनंती भास्कर जाधव यांना करत होतो, तुम्ही अशा प्रकारे बोलू नका. मात्र, भास्कर जाधव हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. सत्ताधारी पक्षाचा बाप अशा शब्दांचा उल्लेख त्यांनी केल्यामुळे मला त्यांना बोलावं लागलं”, असं स्पष्टीकरण सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलं आहे.