व्याघ्र दर्शनासाठी जगात प्रसिध्द असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पून्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतरत्न सचिन तेंडूलकर याने नुकताच ताडोबाचा दौरा केला. ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर तेंडूलकर याने ताडोबा प्रकल्पातच पोळ्याचा सण साजरा केला. तुकूम येथील विनोद निखारे व तेजराम खिरटकर या दोन शेतकऱ्यांच्या बैलजोडीची पूजा केली. शेतकऱ्यांचा टोपी, दुपट्टा देवून सत्कार केला. सचिन तेंडुलकरने सलग तीन दिवस मदनापूर बफर प्रवेशद्वार व इतर प्रवेशद्वारावरून ताडोबातील जंगल सफारीचा आनंद घेतला.

दरम्यान, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी हत्ती कॅम्प मध्ये लक्ष्मी या हत्तीनीने सोमवार ६ सप्टेंबर पोळ्याच्या दिवशी रात्री उशिरा एका गोंडस नर हत्तीला जन्म दिला. या गोड बातमीमुळे ताडोबा प्रकल्पात मुक्कामी असलेल्या भारतरत्न सचिन तेंडूलकर याने आनंद व्यक्त केला. ताडोबात बोटेझरी येथे हत्ती कॅम्प आहे. या हत्ती कॅम्पमध्ये हत्ती ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या हत्ती कॅम्प मधील एका हत्तीने चवताळून ताडोबा कार्यालयात कार्यरत लेखापालाला चिरडले होते. त्यात या लेखापालाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ताडोबातील हत्ती सफारी बंद आहे. बोटेझरीच्या हत्तीकॅम्प मध्ये हत्तींना ठेवण्यात आले आहेत. दरम्यान आता लक्ष्मी हत्तीनीने एका गोंडस हत्तीला जन्म दिल्यानंतर ताडोबा प्रकल्पात नवचैतन्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सचिनचे काही फोटो महाराष्ट्र पर्यटन विभागानेही त्यांच्या ट्वीटरवर शेअर केले आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा नेहमीच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देत असतो. काही महिन्यांपूर्वी तो सहकुटुंब ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी आला होता.