क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. या दोघांसह अजित आगरकर आणि अन्य क्रिकेटपटूही आचरेकर सरांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी  त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

आचरेकर यांनी सचिनसह बलविंदर सिंग संधू, लालचंद रजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण अमरे, सुलक्षण कुलकर्णी, पारस म्हांब्रे, समीर दिघे आणि विनायक सामंत यांच्यासारखे अनेक क्रिकेटपटू आणि निष्णात प्रशिक्षक घडवले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्यांचे मोठे योगदान मिळाले आहे. २०१०मध्ये पद्मश्री किताब देऊन सरकारने त्यांचा गौरव केला होता.

आचरेकर सरांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेटविश्वात शोककळा पसरली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर यांनी आचरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

आचरेकर यांचा जन्म ३ डिसेंबर १९३२ या दिवशी झाला. १९४३ पासून त्यांनी क्रिकेटला प्रारंभ केला. १९४५ पासून ते न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबसाठी खेळायचे. याशिवाय त्यांनी यंग महाराष्ट्र ईलेव्हन, गुलमोहर मिल्स आणि मुंबई बंदर या संघांचेही प्रतिनिधित्व केले. आचरेकर हे एकमेव प्रथम श्रेणी सामना खेळले. १९६३ मध्ये मोईन-उद-डोवला करंडक क्रिकेट स्पध्रेत ते स्टेट बँक ऑफ इंडियाकडून हैदराबादविरुद्ध खेळले होते. मात्र प्रशिक्षकाच्या कारकीर्दीइतकी त्यांची खेळाडू म्हणून
कारकीर्द गाजली नाही. त्यानंतर प्रशिक्षक म्हणून सुरुवात केल्यानंतर काही काळ मुंबई क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्यत्वही त्यांनी भूषवले होते.