Sachin Waze Bail : माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा जामीन मंजूर केला आहे. सचिन वाझे हा २०२१ पासून तुरुंगात आहे.

दरम्यान, मुंबईतील अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याआधी काही आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे. त्यानंतर आज (२९ सप्टेंबर) मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने सचिन वाझेला जामीन मंजूर केला आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरण काय आहे?

मुंबईतील अँटिलिया इमारतीबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकं ठेवलेली एक गाडी आढळून आली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता. त्यानंतर ५ मार्चला उद्योगपती मनसुख हिरेन यांचा संशायस्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या संपूर्ण घटनेबाबत अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते.

त्यानंतर या संपूर्ण घटनेचा तपास एनआयएने केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. या प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझेला विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सचिन वाझे तुरुंगातून बाहेर येणार?

मुंबईतील अँटिलिया स्फोटक प्रकरणात जवळपास साडेपाच वर्षांनंतर सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे हा तुरुंगात आहे. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सचिन वाझेला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. दरम्यान, आता विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर वाझे तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.