गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाची हाणामारीत झालं शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला आहे. या आरोपानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलीस स्टेशन परिसरात आपण कोणताच गोळीबार केलेला नाही, कोणताही गुन्हा केलेला नाही. जाणीवपूर्वक बदनाम करण्याची ही रणनीती असल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे.

हेही वाचा- “…अन् पोलीस अधिकारीही भयभयीत झाले” प्रभादेवी प्रकरणावर शिवसेना नेते सुनील शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

हा सगळा बदनामीचा प्रकार

दादरमध्ये झालेल्या राड्यानंतर सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतही सरवणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पोलिसांवर दबाव आणून कुणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्याचा तपास करतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या भागातील आमदार असल्याने हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा त्यांनी सांगितले. आपण कामातून मोठे झालेलो आहोत, भांडणे करुन मोठे झालेले नाही. भविष्यात असे वाद करु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांना मदत करण्यासाठी, त्यांनी चौकशीला बोलावले तर जाऊ असेही ते म्हणाले.

एकमेकांना कामाने जिंकू

पोस्टर फाडून, दगडफेक करुन माझे काम संपवता येणार नाही, असेही सरवणकर यांनी म्हटले आहे. यामागे बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केले आहे. अशा प्रकारचा उद्रेक करण्यापेक्षा एकमेकांना कामाने जिंकू, असा सल्लाही त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, अद्याप या प्रकाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली नसल्याची माहिती सरवणकरांनी दिली आहे.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या सभेला हजर राहणाऱ्यांसाठी नाष्टा, जेवण आणि रोख रकमेची व्यवस्था? अंबादास दानवेंचे गंभीर आरोप

शनिवारी रात्री काय झाले?

काल शनिवारी रात्री बारा वाजता शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यावर हल्ला करण्यासाठी काही जण पोहचले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्वागत कक्षात डिवचण्याचा प्रकार झाला, त्याचा राग मनात धरुन हे तिथे पोहचले असे सरवणकर यांनी सांगितले. सोशल मीडियावर टीका झाली असेल तर त्याचे उत्तर सोशल मीडियातून द्यायला हवे. घरी जाऊन मारहाण करणे अयोग्य आहे. मला याबाबत माहिती मिळाल्यावर तिथे गेलो तिथून पोलीस स्टेशनला गेलो. सणासुदीच्या दिवशी असे आपआपसात वाद करुन हिंदू समाजाला वेदना होतील, असे प्रकार घडू नये असे प्रयत्न करायला हवेत. ही सगळी एकाच कुटुंबातील एकत्र राहणारी मुलं आहेत, असे वाद चुकीचे आहेत. असेही सरवणकर म्हणाले.