महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सिद्धीविनायक मंदिराबाबत एक खळबळजनक आरोप केला. ‘सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी १८ कोटींची चोरी होते’, असा दावा राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या आरोपानंतर आता सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी वाचून दाखवलेल्या पत्रात चोरीचा उल्लेख नाही अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली आहे.

विश्वस्त सदा सरवणकर काय म्हणाले?

“संशय आला म्हणून विश्वस्तांनी पत्र लिहिलं, हे चांगलं केलं की वाईट केलं? आता ते उत्पन्न ९० लाखांपर्यंत वाढलं आहे. मग चांगलं काम केल्यानंतर तुम्ही शाबासकी देणार की टीका करणार? राज ठाकरे यांनी जे पत्र वाचून दाखवलं, ते अर्धसत्य आहे. कारण आम्ही विविध उपाययोजना केल्यामुळे मंदिराचं उत्पन्न वाढलं. मग वाढलेल्या उत्पन्नाच्या पूर्वीचं जे उत्पन्न होतं, त्याचा ऑडिट रिपोर्ट आलाच पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, हे कोण करणार?”, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं.

“राज ठाकरेंनी एका सभेत बोलताना सिद्धीविनायक मंदिराबाबत गौरसमजाने काही गोष्टी सांगितल्या. पण सिद्धीविनायक मंदिराचे आमचे जे काही विश्वस्त आहेत, ज्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या माध्यमातून चौकशी करा, अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा उल्लेख करताना नागिरकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना निर्माण झाल्या. पण सिद्धीविनायक मंदिर न्यास अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे”, असंही सदा सरवणकर यांनी सांगितलं आहे.

“राज ठाकरेंनी वाचून दाखवलेल्या त्या पत्रामध्ये चोरी असा कुठेही उल्लेख नाही. दोन वर्ष म्हणजे पूर्वी सिद्धीविनायक मंदिर न्यासाची जी काही दानपेटी होती, त्या दानपेटीत येणारी रक्कम साधारण ४० ते ४५ लाख रुपये होती. आता गेल्या महिन्यापासून ही रक्कम ९०, ९५, ९८ लाखांपर्यंत वाढली. त्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या, त्यामुळे ही रक्कम वाढली. आता मागील दोन वर्षांचं ऑडिट सरकारकडे जाईल, तेव्हा वाढलेली रक्कम आणि दोन वर्षांपूर्वीची ४० ते ४५ लाख ही रक्कम याचं संपूर्ण ऑडिट होईल, तेव्हा निश्चितच एक संशयाची भावना निर्माण होईल”, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं.

राज ठाकरेंनी काय आरोप केले?

सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिलेलं एक पत्र राज ठाकरे यांनी वाचून दाखवलं. राज ठाकरे म्हणाले की, “महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धीविनायक न्यास मंदिर प्रभादेवी, मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब आमची संबंधित ट्रस्टमध्ये विस्वस्त म्हणून आपण नियुक्ती केली, आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मंदिराची मिळकत ३५ टक्के जादा वाढवण्यास आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. महोदय, मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरणारे काही कर्मचारी पकडले गेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीतील रकमेची मोजदात ही ५० लाख रुपयांच्या आत होती. मात्र, हे कर्मचारी पकडल्यानंतर गेल्या तीन आठवड्यात दानपेटीतील रक्कम ही दीड कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली. याचाच अर्थ आधी दर आठवड्याला दानपेटीत जमा होणाऱ्या एकूण पैशामधून काही रक्कम लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचं मंदिराचं नुकसान होत होतं, याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत आहेत असा आमचा ठाम संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी आमची विश्वस्त मंडळाची अपेक्षा आहे”, असा पत्रातील मजकूर राज ठाकरे यांनी भाषणात वाचून दाखवला.

“हे पत्र सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाचं आहे, म्हणजे सिद्धीविनायक मंदिरातून दरवर्षी १८ कोटींची चोरी होते. आपण भाविक म्हणून तिकडे जातो, दानपेटीत दान टाकतो आणि इकडे असल्या चोऱ्या होतात. ही माणसं सगळी मंदिरे लुटत आहेत. आपले लोक किंवा विद्यार्थी परिक्षांच्या आधी किंवा नोकरीच्या दरम्यान मंदिरात जातात आणि देवाकडे श्रद्धेने मला नोकरी मिळू दे अशी मागणी करतात, पण त्याच मंदिरात आज चोऱ्या होत आहेत. मंदिरातीलच माणसं या चोऱ्या करतात. हा आमचा धर्म? ही आमच्या धर्माची मंदिरं? मग अशी जर देशाची परिस्थिती असेल तर काय होईल? मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून यावर विचार करणं गरजेचं आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.