Sadabhau Khot on Sharad Pawar NCP: विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. “राष्ट्रवादी हा पक्ष नव्हे तर टोळी आहे, अशी टीका करताना, “या टोळीपासून साध राहावे”, असा सल्ला खोत यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. आमदार खोत यांनी यावेळी सांगली जिल्हा बँकेतील भ्रष्टाचार आणि नोकर भरती घोटाळ्यावर देखील बोट ठेवले. विधानभवन परिसरात आमदार खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीबाबत आमदार खोत काय म्हणाले?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता सदाभाऊ खोत यांनी, “राष्ट्रवादी हा काही पक्ष नव्हती ती टोळी होती. ही टोळी आता फुटायला लागली आहे. बऱ्याचअंशी ती फुटलीही आहे. या टोळीला आता अलिबाबाची गुंफा मिळेल का, यासाठी हातपाय मारत आहेत, त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. या टोळीचे मार्गक्रमण कशापद्धतीने सुरु आहे हे थोड्याच दिवसांत लक्षात येईल. महायुतीच्या नेत्यांना माझं सांगणे आहे या टोळीपासून सावध राहा, याच टोळीच्या विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे”, असे सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंचे आभार
विधानसभेत महिला सक्षमीकरण धोरण विधेयक मंजूर झाल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. शरद जोशींचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम फडणवीस यांनी केल्याचेही खोत यांनी यावेळी नमूद केले. शेतीसाठी लागणाऱ्या माती, मुरुम यावरील रॉयल्टी १०० टक्के माफ केल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील खोत यांनी आभार मानले. राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणे आणि खतांची विक्री होत असून, याविरोधात राज्य सरकारने कारवाई करावी यासाठी सभागृहात लक्षवेधी मांडल्याचेही खोत यांनी यावेळी सांगितले.
सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवर भाष्य
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरतीला स्थगिती देण्यात आल्याप्रकरणी बोलताना खोत यांनी बँकेवर प्रशासक नेमण्याची गरज व्यक्त केली. “संचालकांनी बँक वाटून खाल्ली आहे. कर्जवाटपात अनियमितता आहे. बँकेत भ्रष्टाचार या संचालक मंडळाने केला आहे. निवडणुका ४ महिन्यावर असताना बँकेने नोकरभरतीचा घाट घातला. यातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार होता. पास उमेदवारांना देखील नापास करणार होतं”, असा आरोप सदाभाऊ खोत म्हणाले. यातून लाभ कोणाला होणार होता यावर बोलताना, बँकेचे अधिकारी, संचालक, जे स्वत:ला बँकेचे मालक समजतात आणि अभ्यासू नेते म्हणून राज्यात गाजावाजा करतात त्यांचा यात हात होता, असा आरोपही खोत यांनी केला.
