Sadabhau Khot Son Celebration: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राज्यात भाजपाचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी दिग्गज उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागल्याचंही पाहायला मिळालं आहे.

१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्याची मोठी चर्चा झाली होती. कारण या निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.

सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. जयंत पाटील हे लवकरच भाजपात येतील, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं, तर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ‘सदाभाऊ कुणाचेच होणार नाही’, असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी जयंत पाटलांना शड्डू ठोकत खुलं आव्हान दिलं आहे.

सागर खोत यांचा व्हिडीओ व्हायरल

सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील यशानंतर ते जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. यावेळी सागर खोत हे जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत खुलं आव्हान देताना दिसत आहेत.

सागर खोत यांनी म्हटलं की, “ज्यांना तू बेटा म्हणालास, त्यांचा मी बेटा आहे बेटा. पुढच्या वेळी कासेगावचं पार्सल कासेगावला पाठवणार”, असं म्हणत सागर खोत यांनी जयंत पाटील यांना खुलं आव्हान दिलं आहे.

जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी काय आरोप-प्रत्यारोप केले होते?

सदाभाऊ खोत यांनी एका सभेत बोलताना म्हटलं होतं की, ‘आता काटा उलटा फिरायला लागला आहे, जास्त दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसात भाजपात येतील’, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनी म्हणाले होते की, ‘दहा पक्ष बदलून हे तिकडे गेले आणि आता ते मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देत आहेत’, असं म्हणत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.