Sadabhau Khot statement NEET protesters: नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनावरुन आमदार सदाभाऊ खोत यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला दहशतवाद्यांची उपमा दिली. तसेच, केंद्रीय शिक्षण मंत्री, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजिबात घेऊ नका”, असेही खोत यांनी म्हटले आहे. अशा दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या अशी मागणी खोत यांनी केली.
नक्की काय म्हणाले सदाभाऊ खोत?
“संपूर्ण प्रकारात राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी या देशात दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करु पाहत आहे. पण, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, काही बदल होणार नाही. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजिबात घेऊ नये. या दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारने उत्तर द्यावे, जशास तसं उत्तर द्यावं”, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
अंजली दमानियांकडून टीका
सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोत यांच्यावर टीका केली. “खोत यांचे संपूर्ण आयुष्य तथाकथित शेतकरी आंदोलन करण्यात गेले, त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर हा व्यक्ती कसा वागू शकतो, सत्तेचा माज कसा असतो हे यातून दिसते”, अशी टीका दमानियांनी केली. “ज्या व्यक्तीला शिक्षण या शब्दाचा अर्थच माहिती नाही, ज्या व्यक्तीला आंदोलनाचा विसर पडला आहे, त्यांची प्रतिक्रिया देखील घेतली नाही पाहीजे”, असे दमानिया म्हणाल्या.
राजू शेट्टींची खोतांवर टीका
खोत यांच्या वक्तव्याचा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील तीव्र शब्दात निषेध नोंदवला. “मावळमधील शेतकरी आंदोलनात गोळीबार झाला त्यावेळी खोत यांनी केलेली भाषणं पुन्हा पहावीत. पेपरफुटीत असणारे लोक आरएसएस आणि भाजपाच्या जवळपास असणारेच लोक आहेत. हा गैरप्रकार रोखण्याची मागणीच हे आंदोलन करणारे विद्यार्थी करत आहेत. अशावेळी खोत यांनी विद्यार्थ्यांच्या मागे उभं राहायला हवं होतं”, असे शेट्टी म्हणाले. “नैतिकतेच्या आधारावर प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, त्यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर मोदींनी राजीनामा द्यावा”, असे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.
