माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये खोत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी ही खोचक मागणी करणारं पत्र लिहिलं आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बियाणं पुरवण्याची मागणी…
“पवार यांना जाणते राजे म्हटलं जातं. राज्यात मागील काही काळामध्ये महापूर, अतीवृष्टीमुळे शेतकरी कोलमडलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारकडे अशी विनंती केलीय की आमच्या शेतात गांजा लावायला परवानगी द्या, कारण शेती परवडत नाही,” असं खोत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं. याच गांजा लागवडीच्या मागीच्या पार्श्वभूमीवर खोत यांनी हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी बियाणं पुरवण्याची मागणी करणारं पत्र पवारांना लिहिलं आहे.

नवाब मलिकांच्या जावयाप्रमाणे शेतकरीही श्रीमंत होऊ द्या…
“अलीकडच्या काळात ड्रग्सच्या प्रकरणामध्ये या राज्यातील ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे काहीतरी गांजा सापडला. ते म्हटले की पवार साहेब म्हणाले की ती हर्बल वनस्पतीयुक्त तंबाखू होती. तो काही गांजा नव्हता, अशा प्रकारचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं. म्हणून मी पवार यांना पत्र लिहिलं आहे. त्यात मी ती हर्बलयुक्त वनस्पतीपासून बनणारी तंबाखू आहे तिचं बियाणं कुठं मिळतं? त्याचं बियाणं आम्हाला तुम्ही उपलब्ध करुन द्या कारण तुम्ही आता त्याला मान्यता दिलीय. म्हणजे या राज्यातील शेतकरी आता त्याची पेरणी करेल. जसा यातून नवाब मलिक यांचा जावई श्रीमंत झाला तशी श्रीमंती राज्यातील शेतकऱ्याला येईल. त्यामुळे या राज्यातील शेतकरी चिंतामुक्त होईल. मुख्यमंत्री सांगतात की मला शेतकरी चिंतामुक्त करायचा आहे. तर मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आता संधी आलीय चिंतामुक्त करायची,” असं उपरोधिक पद्धतीचं स्पष्टीकरण या पत्राबद्दल बोलताना खोत यांनी दिलंय.

…म्हणून पवारांनाच पत्र
“पवार साहेब हे शेतीतील जाणते आहेत. या सरकारचे ते सर्वेसर्वा आहेत. धाडी चुकीच्या पद्धतीने पडत आहेत. तो गांजा नव्हता हर्बलयुक्त तंबाखू होती असं ते म्हणालेत. याच कारणामुळे मी त्यांना पत्र लिहिलं आहे,” असं हे पत्र पवारांनाच का लिहिलं या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

नवाब मलिक नक्की काय म्हणाले होते?
मलिक यांनी त्यांचे जावई समीर खान यांना अडकवण्याचा प्रयत्न एनसीबीने केल्याचा आरोप केला होता. “१४ जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले की, मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाला खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी खोटे दावे करुन करुन लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले. “करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना अडकवण्यात आलं आहे,” असं नवाब मलिक म्हणाले होते. अभिनेती रिया चक्रवर्तीच्या प्रकरणातही असेच झाले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला होते. एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि तंबाखू (टोबॅको) यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हटलं होतं.

शासन आदेशाची होळी करणार…
“१० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यातले केवळ ३५० कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. फडणवीसांच्या काळात शेतकऱ्याला गुंठ्याला ९५० रुपये मदत मिळालेली. तुमच्या काळात शेतकऱ्याला गुंठ्यामागे १२५ रुपयांपासून १५० पर्यंत मिळत आहे. २०१८-१९ ला उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन म्हणाले होते की, ५० हजार जिरायती आणि एक लाख बागायती शेतीला मदत करु. ती घोषणा आता का अंमलात आणत नाही. आता तिजोरीच्या दाराला कुठलं कुलूप घातलं आहे. तिजोरीची किल्ली समुद्रात टाकली काय? ती तिजोरी खोला आणि शेतकऱ्यांना मदत करा. पण मदत करायची यांची दानत नाही. २० ऑक्टोबरला राज्यभर सरकारच्या मदतीच्या जीआरची होळी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहोत,” असंही खोत म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot wrote letter to ncp leader sharad pawar asking for permission to cultivate herbal tabaco by maharashtra farmers scsg
First published on: 19-10-2021 at 08:33 IST