हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग: बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने अटी आणि शर्तीवर परवानगी दिली आहे. त्याची पायमल्ली करून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धाचे आयोजन सुरू झाले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुरुड, अलिबाग आणि कर्जत येथे झालेल्या स्पर्धामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बैलगाडी स्पर्धाच्या आयोजनातील सुरक्षेचा मुद्दा चव्हाटय़ावर आला आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
Hapus mango, problems before Hapus mango,
लहरी निसर्गाचा फटका, कर्नाटककडून स्पर्धा, कीडरोगाचा धोका… ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यासमोर आणखी किती संकटांची मालिका?
police checked groom vehicle
शुभमंगल नंतर आधी सावधान! पोलिसांनी नवरदेवाच्या गाडीची घेतली झाडाझाडती; काय आहे नेमका प्रकार?

बैलगाडी स्पर्धाच्या आयोजनावर असलेली बंदी न्यायालयाने उठवली आहे. मात्र ही बंदी उठवताना काही अटी आणि शर्ती न्यायालयाने घालून दिल्या आहेत. याकडे स्पर्धेच्या आयोजकांकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. स्पर्धेच्या आयोजनापुर्वी जिल्हाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी न घेताच या स्पर्धाचे आयोजन होत असल्याचे दिसून येत आहे.

मुरुड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी अशाच एका बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एक बैलगाडी थेट प्रेक्षकात शिरली. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. यानंतर स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर अशाच एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वरसोली येथील उमेश वर्तक यांना स्पर्धेतील एका बैलगाडीने धडक दिली होती. यात गंभीर जखमी झाले, गेला महिनाभर त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी उपाचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील उक्रूळ येथे धूलिवंदनाचे औचित्य साधून बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. अनधिकृतपणे आयोजित केलेल्या या स्पर्धेदरम्यान एक बैलगाडी प्रेक्षकात घुसली. यात दौलत बाजीराव देशमुख हे गंभीर जखमी झाले. डोक्याला गंभीर जखमी झाली, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. जखमी देशमुख यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आयोजकांनी साधी तसदी घेतली नाही.

या तीन घटनांमुळे अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडी स्पर्धाचा आणि स्पर्धे दरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला आहे. बैलगाडी स्पर्धामुळे दोन जणांचे हकनाक बळी गेले आहेत.

पोलीस आणि महसूल प्रशासनाने अनधिकृतपणे आयोजित केल्या जाणाऱ्या बैलगाडी स्पर्धाना प्रतिबंध घालावा. स्पर्धाचे रीतसर परवानगी घेऊन आयोजन व्हावे, न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन व्हावे, स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेची काळजी आयोजकांनी घ्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

स्पर्धा जिंकली पण जीव गेला.अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील उमेश वर्तक यांना बैलगाडी स्पर्धेची प्रचंड आवड होती. त्यांची बैलजोडी तालुक्यात प्रसिध्द होती. गेल्या महिन्यात आयोजित बैलगाडी स्पर्धेत त्याची बैलगाडी पहिली आली. मात्र ही स्पर्धा बघत असताना वर्तक यांना मागून आलेल्या एका बैलगाडीने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. महिनाभर त्यांच्यावर मुंबईत अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

न्यायालयाने बैलगाडी स्पर्धाना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने घालून दिलेल्या शर्तीचे पालन व्हायलाच हवे, जिल्हा प्रशासनाने ती जबाबदारी तंतोतंत पार पाडायला हवी, पण तसे होत नाही. त्यामुळे लोकांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा पध्दतीने अनधिकृत स्पर्धाचे आयोजन केले जात असेल तर आयोजकांवर ठोस कारवाई व्हायला हवी, स्पर्धेदरम्यान जखमी होणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी ही आयोजकांवर टाकायला हवी.

-संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते