सुरक्षिततेच्या नियमावलीचे पालन योग्य पद्धतीने होत नसल्याचे उघड

नीरज राऊत/हेमेंद्र पाटील, पालघर

जागतिक मंदीच्या नावाखाली पर्यायी उत्पादने करण्यास आणि त्या अनुषंगाने ‘जॉब वर्क’ करण्याचा सपाटा तारापूर औद्योगिक वसाहतीतील अनेक रासायनिक उद्योग करीत आहेत. उत्पादनादरम्यान घ्यावयाची दक्षता आणि सुरक्षिततेच्या नियमावलीचे पालन योग्य पद्धतीने होत नसल्याने औद्योगिक वसाहतीत लहानमोठे अपघात सातत्याने घडत असतात. अशाच एका ‘जॉब वर्क’चा रासायनिक प्रक्रियेदरम्यान ‘स्क्वेअर केमिकल्स’मध्ये झालेल्या गळतीची बाधा होऊन तीन कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत.

तारापूर औद्योगिक वसाहतीत ३००हून अधिक रासायनिक उत्पादन घेणारे लघुउद्योजक असून जागतिक स्पर्धा, मंदीचे वातावरण आणि इतर कारणांमुळे अशा उद्योगांनी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेतलेल्या उत्पादनाच्या व्यतिरिक्त इतर उत्पादने ‘जॉब वर्क’च्या माध्यमातून घेतली जातात. इतर मोठय़ा कंपन्यांसाठी उत्पादन करून देताना या प्रक्रियेत वापरली जाणारी आणि उत्पादित होणारी रसायनांची पुरेशा प्रमाणात माहिती नसल्याने तसेच उत्पादन प्रक्रियेतील संभाव्य धोक्यांची माहिती नसल्याने हे अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. कंपन्यांमध्ये बदल करण्यात येणाऱ्या या उत्पादनांची माहिती उद्योजक औद्य्ोगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची उद्योगावरील पकड सैल होत चालल्याने कामगार बळी पडत असल्याचे तारापूरमध्ये दिसून येत आहे.

‘स्क्वेअर केमिकल्स’ या तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एन-६० या कंपनीत ४-क्लोरो ब्यूटनॉल या रसायनाचे उत्पादन टेट्राहायड्रोफ्युरान आणि थायोनील क्लोराईड या कच्च्या मालाच्या मदतीने घेतला जात होती. या उत्पादनाची मुख्य रासायनिक प्रक्रिया संपल्यानंतर थायोनील क्लोराईडचे अवशेष असलेल्या ड्रममध्ये पाण्याचा संपर्क आल्याने हायड्रोजन क्लोराइड आणि सल्फर डायॉक्साईड हे विषारी वायू मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्याने कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकासह तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल औद्योगिक सुरक्षा विभागाने दिला आहे.

कंपनीत वापरण्यात येणाऱ्या रसायनांची माहिती कंपनीबाहेर फलकावर ठळकपणे प्रकाशित करणे अपेक्षित असताना, अशा कोणत्याही प्रकारची माहिती अपघातग्रस्त कंपनीच्या बाहेर दिसून आली नाही.

त्याचप्रमाणे पूर्वी असलेल्या युनिकॉन फायब्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नव्या व्यवस्थापनाने २०१६ मध्ये खरेदी केल्यानंतर बदललेल्या कंपनी व्यवस्थापक मंडळाची माहिती, तसेच नव्याने घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची माहिती तारापूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरासाठी अपघातांची टांगती तलवार डोक्यावर कायम राहणार आहे.

‘सायनाइड’ची बाधा?

‘स्क्वेअर केमिकल्स’मधील दुर्घटनेस ‘थायोनील क्लोराईड’ हे रसायन जबाबदार असल्याच्या प्राथमिक निष्कर्षांवर शासकीय अधिकारी आले आहेत. तरीही ज्या पद्धतीने विषबाधा होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला, तसेच मृतदेहांची पाहणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या रसायनाची बाधा झाली, हे सर्व पाहता या दुर्घटनेत मधुर गंध असलेला साइनाइड वायू कारणीभूत असावा, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अपघातग्रस्त कंपनीला कुलूप

अपघातग्रस्त ‘स्क्वेअर केमिकल्स’ने काही महिन्यांपासून परिसरातील काही कंपन्यांचे ‘जॉब वर्क’द्वारे रासायनिक उत्पादन सुरू करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या कंपनीत अपघात झाल्यानंतर तिच्या मुख्य प्रवेशद्वाराला तसेच लगतच्या कंपनीच्या प्रवेशद्वारावर टाळे लावल्याचे दिसून आले आहे. कंपनीत नेमका कोणत्या प्रकारे अपघात घडला याची माहिती गोळा करण्याचे काम औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू  आहे.