नुकत्याच आलेल्या महापुरात आम्ही वाहून गेलो. या लोकसभा निवडणुकीने व्यवस्थापनाचे महत्त्व खऱ्या अर्थाने लक्षात आणून दिले आहे. योग्य व्यवस्थापन केले गेले नाही तर काय होऊ शकते, याची अनुभूती सर्वानी घेतली आहे, अशी टिप्पणी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत केली. जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा) संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त सोमवारी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनाही निमंत्रित करण्यात आले होते, परंतु ते उपस्थित नव्हते. हा संदर्भ घेत तटकरेंनी आपले सहकारी कार्यक्रमास आले असते तर आनंद झाला असता, असे नमूद करत सद्यस्थितीत सर्वाना आत्मविश्वास देण्याची गरज असल्याचे सांगितले.
महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर व एकनाथ पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रणजीत कांबळे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) जयदत्त क्षीरसागर यांना निमंत्रित करण्यात आले होते, परंतु भुजबळ यांच्यासह अनेक मंत्री महोदय या कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे पानिपत झाल्याचा जबरदस्त धक्का अनेकांना बसला आहे. त्यामुळे अद्याप कोणी जाहीर कार्यक्रमात सहभागी होण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. जलसंपदामंत्री तटकरे मात्र त्यास अपवाद ठरले. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून अंतर्धान पावलेल्या भुजबळांवर त्यांनी नाव न घेता केलेली टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांना पावणे दोन लाखहून अधिक मतांनी पराभवाला तोंड द्यावे लागले. राज्यातील निकालांबाबत पत्रकारांनी छेडले असता तटकरे यांनी दीड ते दोन लाखांपेक्षा आपला अतिशय कमी मतांनी झालेला पराभव समाधानकारक असल्याचे सांगितले. कार्यक्रमातील भाषणाची सुरुवात त्यांनी महापुरात आम्ही वाहून गेल्याचे सांगत केली. निवडणूक प्रचाराचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर बिकट स्थिती ओढावू शकते, याचा धडा लोकसभा निवडणुकीने दिल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे राजकारणात व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा घटक असल्याचे ते म्हणाले.