नेरळ : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील 250 नामांकित व्यक्तींना राष्ट्रपती कार्यालयाने निमंत्रित केले आहे. ती २५० निमंत्रित यांच्यामध्ये कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शेती क्षेत्रातील नामांकित व्यक्तीला असा बहुमान मिळत असल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
राज्य सरकार कडून कृषी भूषण आणि कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शेतकरी शेखर भडसावळे यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शेखर भडसावळे यांनी भाताच्या विविध जातींचे वाण शोधण्यात मोठे योगदान आहे. त्यानंतर त्यांनी पारंपारिक शेती मध्ये बदल घडवून आणण्यासाठी मशागत मुक्त शेती ही संकल्पना एस आर टी चे माध्यमातून विकसित केली आहे.
तर कमी खर्च आणि मजुरांची संख्या कमी करण्यात एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. अन्न निर्मिती मध्ये महत्वाचे योगदान असलेले सगुणा रुरल फाउंडेशन च्या निर्मितीत महत्वाचे योगदान शेखर भडसावळे यांचे राहिले आहे.शेती बरोबर वणवे रोखण्यासाठी सगुणा वनसंवर्धन समिती तसेच सांडपाणी मुळे नदी नाले यांना जलपर्णी यांनी वेढले असून त्यावर मात करण्यासाठी देखील सगुणा रुरल फाऊंडेशन कार्य करीत आहेत.
या सर्व कार्याची दखल घेत शेखर भडसावळे यांना देशाच्या राष्ट्रपती यांच्याकडून यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. देशातील २५० महनीय व्यक्तींना राष्ट्रपती भवनाकडून राष्ट्रपती भवन येथील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. शेखर भडसावळे यांना हे निमंत्रण नेरळ पोस्ट कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी सगुणा बाग येथे जाऊन दिले. शेतकरी वर्गासाठी हा आनंदाचा क्षण असून सगुणा बाग मध्ये त्याबाबत जल्लोष साजरा होत आहे.
