रत्नागिरी : कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता असलेली एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, येत्या बुधवारी ते भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे ठाकरे सेनेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाचे प्रभावी आणि खंबीर नेतृत्व म्हणून सहदेव बेटकर यांची ओळख आहे. कुणबी आणि ओबीसी समाजामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क व प्रभाव असल्याने त्यांच्या पक्षांतराचे राजकीय परिणाम दूरगामी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील स्थानिक राजकारणात या समाजघटकांची भूमिका निर्णायक मानली जाते. त्यामुळे बेटकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मोठी ताकद मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच बेटकर यांनी ठाकरे सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. या माध्यमातून भाजप कोकणातील आपला प्रभाव अधिक मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष लागले आहे. सहदेव बेटकर यांच्या माध्यमातून कुणबी व ओबीसी मतदारांमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली, तर ठाकरे सेनेसमोर नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, बेटकर यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचे पक्षांतर नसून कोकणातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा राजकीय टर्निंग पॉइंट ठरू शकतो.