महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका मागच्याच आठवड्यात पार पडल्या आहेत. त्यात भाजपा आणि महायुतीची सरशी झाली. आता मुंबईचा महापौर कोण होणार याचा पेच सुटणं बाकी आहे. दरम्यान विविधं वक्तव्यं आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दिवसभरातली पाच वक्तव्यं कुठली आपण जाणून घेऊ.
सगळा मुंब्रा हिरवा करायचा आहे, सहर शेखचं वक्तव्य
मुंब्रा येथील विजयी सभेत सहर शेख हिने भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होतो आपण त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे, आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही. प्रभाग क्रमांक ३० मध्ये सगळ्यांनी भरभरुन मतदान करुन एमआयएमच्या उमेदवारांना जिंकवले. पाच वर्षांनी याठिकाणी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे. या लोकांना इथून पळून जावे लागले पाहिजे. पाच वर्षांनी मुंब्रा परिसरात सगळे एमआयएमचे उमेदवार निवडून येतील, ही मजलिसची ताकद आहे. ही ताकद आपल्याला अल्लाहने दिली आहे. मुंब्रा परिसरात नोटाला जास्त मतदान झाले आहे. मुंब्रा परिसरात तुतारीच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतं पडली आहेत.
जयकुमार गोरेंची प्रणिती शिंदेंवर जोरदार टीका
मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी प्रणिती शिंदेच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. प्रणिती ताईंनी सुशीलकुमार शिंदे साहेबांनी मोठी केलेली काँग्रेस संपवण्याचे काम केलं. आयुष्यभर कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांनी सोबत घेतलं, त्या कार्यकर्त्यांचे वाटोळं प्रणिती शिंदेनी केलं, अशा शब्दात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंवर बोचरी टीका केली. ज्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती त्या त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्या. त्यामुळे दोन नगरसेवक आल्यावर देखील समाधान वाटतंय. ८७ नगरसेवक आलेल्या भाजपवर त्या टीका करत आहेत. मी बोललो तर त्यांना लागायचं काही कारण नाही, एवढा मोठा पराभव झाला तर ते स्वीकारायाला हवं. पालकमंत्र्यांनी गल्ली बोळात जाऊन पैसे वाटले वगैरे त्यांनी म्हटलं, त्यावेळी त्या सन्मानाने बोललं होतं का? तुम्ही दुसऱ्याचा सन्मान करा मग तुमचा ही सन्मान होईल, असा पलटवारही गोरेंनी केला. आपण लोकसभेला कुठे कुठे चर्चा केल्या होत्या हे सांगायला मला भाग पाडू नका. मी संधीसाधू आहे की काय आहे, हे भाजपला चांगलं माहिती आहे. मी जिथे आहे तिथे चांगलं काम करतो, ताईंनी आत्मपरीक्षण करावं, कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवता. बघा आपला घरं आणि अवस्था काय आहे,दोन नगरसेवक आलेत त्यांना आधी टिकवा, अशा शब्दात गोरेंनी प्रणिती शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
संजय राऊत यांचा मोठा आरोप
संजय राऊत यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजपाबाबत मोठा दावा केला आहे. “भाजपाच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवले आहेत. नगरसेवकांवर लक्ष ठेवलं जात आहे. आत्ता ताज लँड्समध्ये कैदखान्यात असणाऱ्या नगरसेवकांचेही फोन टॅप होत आहेत. रश्मी शुक्ला नसल्या, तरी प्रक्रिया तीच आहे. भाजपा आपल्या स्वत:च्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहेत”, असं ते म्हणाले. मुंबईच्या महापौरपदाबाबतच्या चर्चेसंदर्भात त्यांना विचारलं असता त्यावरून राऊतांनी शिंदेंवर टीका केली. “मुंबईचा महापौर कोण आहे हे दिल्लीतून ठरवलं जाईल. आत्तापर्यंत हे इतिहासात कधी घडलं नव्हतं. महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या लोकांना दिल्लीच्या पायाशी जाऊन बसावं लागतंय हा महाराष्ट्राचा अपमान आहे”, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असून तिथेही महापौरपदाबाबत चर्चा चालू असल्याचं ते म्हणाले. “दावोसमध्ये गुंतवणुकीवर कमी चर्चा चालू आहे. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात मुंबईच्या महापौराबाबतच चर्चा चालू असते”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं.
‘शिंदे आणि अजित पवारांचा गेम भाजपा करेल’-नाना पटोले
“महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या आठ दिवसांत खूप मोठे उलटफेर होणार आहेत. मी तुम्हाला हे देखील सांगतो की महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचीच सत्ता पाहिजे असं वातावरण आहे. फक्त यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं. मग लोक बरोबर करतील”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. “शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजपा करेल आणि केला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे या ठिकाणी अजित पवारांची मालकी होती. आता ही मालकी कुणाकडे गेली? तिकडे नवी मुंबई, ठाण्यातही तसंच आहे. त्यामुळे भाजपा काय करणार होतं? हे मी पहिलंच सांगितलं होतं. त्यामुळे अजून आणखी खेळ समोर आहे, आणखी ८ दिवस थांबा, थोडे दिवस थांबल्यानंतर आणखी घडामोडी घडतील”, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
भास्कर जाधव नाराज?
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी केलेल विधान जिल्ह्यात जोरदार चर्चेत आहे. जिल्ह्यातलं मला माहीत नाही पण, माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समितीमध्ये मी सर्व जागा जिंकेन, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं. त्यामुळे, जिल्ह्यातील निवडणुकांकडे त्यांनी काना डोळा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अनेक दिवसांपासून भास्कर जाधव माध्यमांपासून दूर आहेत, राज्यातील राजकीय परिस्थितीवरही ते भाष्य करण्याचे टाळत आहेत. त्यातच, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भास्कर जाधव यांचा केवळ त्यांच्या मतदार संघावर फोकस पाहायला मिळत आहे. पत्रकारांनी जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न केल्यानंतर भास्कर जाधवांनी अजब उत्तर दिलं. मला जिल्ह्याचे माहित नाही, पण माझ्या मतदार संघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार, असे जाधव यांनी म्हटलं. शिवसेना ठाकरे पक्षातील वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या भास्कर जाधव यांनी आपला संपूर्ण फोकस केवळ मतदारसंघातील निवडणुकांवर ठेवल्याने ते पक्षात नाराज आहेत का, अशी देखील चर्चा रंगली आहे.

