Sahar Sheikh Remark on Father Yunus Sheikh, Shiv Sena: मुंब्रा येथील एमआयएम (AIMIM) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निकालानंतर एका सभेत सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘कैसा हराया’ हा डायलॉग मारला होता. याच सभेत बोलत असताना त्यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करायचा असल्याचेही म्हटले होते. यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. आता वडिलांनी हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केल्यानंतर सहर शेख यांना ठाणे हिरवा करणार की भगवा? असा प्रश्न विचारला गेला.
युनूस शेख हे केबल व्यवसायात आहेत. या व्यवसायामुळे ते अखिल भारतीय केबल सेनेचे सदस्य झाले. ही संघटना शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी स्थापन केली होती. “संघटनेने मला कळवा मुंब्रा या विभागाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला नसून केबल सेनेचे कळवा मुंब्रा अध्यक्ष पद मिळाले आहे. मी एमआयएम पक्षातच आहे”, असे युनूस शेख यांनी स्पष्ट केले.
सहर शेख काय म्हणाल्या?
वडिलांच्या निर्णयानंतर माध्यमांनी सहर शेख यांची भूमिका जाणून घेतली. त्यावर त्या म्हणाल्या, वडील ज्या व्यवसायात आहेत, त्या संघटनेचे पद त्यांना दिले आहे. आमची राजकीय भूमिका वेगळी आहे. मी एमआयएमची नगरसेविका आहे. या पक्षातून मी निवडून आले. राजकारणातून आमचे पोट भरत नाही. आमचा केबलचा व्यवसाय असून गेल्या ४० वर्षांपासून आम्ही यात आहोत. त्या संघटनेचे ते अनेक वर्ष सदस्य होते. अखेर त्यांना पद मिळाले आहे. याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते.
‘शिवसेना फक्त हिंदुत्ववादी पक्ष नाही’
हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेशी (शिंदे) कसे काय जोडून घेतले? असा प्रश्न विचारला असता सहर शेख म्हणाल्या, “शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे, यावर आमचा विश्वास नाही. शिवसेना सर्वांना घेऊन जाणारा पक्ष आहे. एएमआयएम ज्याप्रकारे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, शिवसेनाही तशाच प्रकाराचा पक्ष आहे.” हिंदू बहुसंख्य लोक पक्षाचे नेतृत्व करत आहेत, याचा अर्थ मुस्लिमांना पक्षात स्थान नाही, असे होत नाही. मी एमआयएम पक्षात असले तरी माझे वडील कोणत्याही पक्षात नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘ठाणे हिरवा आणि भगवा करणार’
युनूस शेख यांनी ठाणे आता भगवा करू, असे म्हटले होते. यावर सहर शेख यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, आपण ठाणे हिरवा आणि भगवा दोन्ही करू. तसेच ‘कैसा हराया’ या डायलॉगबद्दल विचारले असता, त्यांनी म्हटले की, हा डायलॉग म्हणण्याची वेळ लवकरच पुन्हा येणार आहे.
