सांगली : ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्काराचे वितरण पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गौरव पदक, ३० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सई परांजपे यांनी बालनाट्य, प्रौढ नाटके, नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अनुवाद अशा विविध क्षेत्रांत योगदान दिले आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा ‘मुलांचा मेवा’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. आई शकुंतला परांजपे आणि आजोबा रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्या प्रोत्साहनातून त्यांच्या कलात्मक प्रवासाला दिशा मिळाली.
बालनाट्यांपासून प्रौढ रंगभूमीपर्यंत
परांजपे यांनी मुलांसाठी नऊ नाटके लिहिली. ‘पक्ष्यांचे कवीसंमेलन’, ‘पत्ते नगरीत’, ‘झाली काय गंमत’, ‘जादूचा शंख’ आणि ‘शेपटीचा शाप’ ही त्यांपैकी काही नाटके. ‘झाली काय गंमत’ आणि ‘शेपटीचा शाप’ या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकांचे पुरस्कार मिळाले. त्यांची बालनाटके आजही शालेय स्तरावर सादर केली जातात.
‘नांदा सौख्यभरे’, ‘सख्खे शेजारी’, ‘जास्वंदी’, ‘सोयरीक’, ‘माझा खेळ मांडू दे’ आणि ‘मोगरा फुलला’ या नाटकांतून त्यांनी प्रौढ रंगभूमीवरही आपला ठसा उमटविला. ‘जास्वंदी’ या नाटकाला १९७८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा पुरस्कार मिळाला. ‘सोयरीक’ या नाटकाचाही उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरव करण्यात आला.
तमाशा हिंदी रंगभूमीवर
महाराष्ट्राची लोककला असलेला तमाशा हिंदी रंगभूमीवर नेण्याचे कामही परांजपे यांनी केले. दिल्लीत असताना त्यांनी ‘एक तमाशा अच्छा खासा’ आणि ‘धिक् ताम’ या तमाशाप्रधान नाटकांचे लेखन व निर्मिती केली. पती अरुण जोगळेकर यांच्यासह ‘नाट्यद्वयी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाट्यनिर्मिती केली.
परांजपे यांनी अनेक परभाषिक नाटकांचे मराठी आणि हिंदी अनुवाद केले. नोएल कॉवर्ड यांच्या ‘ब्लाइथ स्पिरिट’चे ‘इडा पिडा टळो’ आणि नील सायमन यांच्या ‘द ऑड कपल’चे ‘तुझी माझी जोडी जमली रे’ ही त्यांची मराठी रूपांतरे आहेत. विजय तेंडुलकर यांच्या ‘गिधाडे’ या नाटकाचे ‘गिद्ध’ हे हिंदी रूपांतरही त्यांनी दिग्दर्शित केले.
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २००६ मध्ये परांजपे यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविले. २०२५ मध्ये त्यांना ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’ मिळाला. आता विष्णुदास भावे गौरव पदकाच्या माध्यमातून त्यांच्या नाट्यविषयक योगदानाचा सन्मान होणार आहे
