सोलापुरात हरित अभियानासाठी ‘सैराट’चे कलावंत आमंत्रित

या उपक्रमात सध्या देशभर तुफान गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील कलावंतांना आमंत्रित केले जात आहे.

सहा लाख ३७ हजार वृक्षांची लागवड

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत येत्या १ जुलै रोजी सोलापूर जिल्हय़ात सहा लाख ३८ हजार वृक्ष लावण्यात येणार असून, त्यापैकी तब्बल पाच लाख ७६ हजार वृक्ष वन विभागामार्फत विविध २९ ठिकाणी लावण्यात येणार आहेत. दरवर्षी होणारा वृक्षलागवडीचा कार्यक्रम निव्वळ सरकारी छाप न ठरता त्यात लोकसहभाग घेतला जाणार आहे. अर्थात, या उपक्रमात सध्या देशभर तुफान गाजत असलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील कलावंतांना आमंत्रित केले जात आहे.

याशिवाय ‘एलिझाबेथ एकादशी’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील ‘झेंडू’ची भूमिका साकार केलेली बालकलाकार सायली भंडारकवठेकर व अन्य कलावंतांसह हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. शहरातील सिद्धेश्वर वनविहारात आयोजिलेल्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात हे कलावंत उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक सुभाष बडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाषा, भूगोलाच्या सीमा ओलांडून तुफान गाजत असलेल्या ‘सैराट’चे बहुतांशी चित्रीकरण सोलापूर जिल्हय़ातील करमाळा तालुक्यात झाले आहे. त्यात एका पूर्णत: जळून गेलेल्या एका झाडावर चित्रपटातील परशा व आर्ची यांचे प्रेम फुलल्याचे दृश्य दाखविण्यात आले आहे. हे जळून गेलेल्या झाडाला प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. म्हणूनच तरुणाई हे झाड पाहण्यासाठी गर्दी करीत, झाडाभोवती ‘सेल्फी’ काढण्यात मग्न आहे. त्यामुळे हे झाड जणू पर्यटन केंद्र बनत चालले आहे. परंतु या सुकलेल्या झाडाला लागून एखादे नवीन वृक्ष लावण्याचा विचार होत नाही. वन विभागातर्फे मात्र या सुकलेल्या ‘सैराट’फेम झाडाला लागून कदंबासह इतर वृक्ष लावण्यात येणार आहेत, असे बडवे यांनी सांगितले.

जिल्हय़ात वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करताना त्यांचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानुसार येत्या २९ जूनपर्यंत तेवढय़ा प्रमाणात म्हणजे सहा लाख ३८ हजार एवढे खड्डे खोदून तयार होणार आहेत. त्यानंतर १ जुलै रोजी प्रत्यक्ष वृक्षारोपण करताना त्याच्या नोंदी उपग्रहाद्वारे ठेवण्यात येणार आहेत. लागवडीसाठी तेवढय़ा प्रमाणात वृक्षांची रोपे तयार असल्याची माहिती बडवे यांनी दिली. या सोलापूर शहरात सिद्धेश्वर वनविहारात एक हजार वृक्षांची लागवड होणार आहे. तर महापालिकेलाही एक हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हय़ात सर्वाधिक दोन लाख ७ हजार वृक्षांची लागवड सांगोला तालुक्यात केली जाणार आहे. यात प्रामुख्याने कटफळ, बागलवाडी, मेडशिंगी, येलमार मंगेवाडी, पाचेगाव, कोळा, राजुरी व घेरडी या भागांचा समावेश आहे. तर माळशिरस तालुक्यात चांदापुरी, धर्मपुरी, पिलीव, वेळापूर, नातेपुते, गिरवी, तरंगफळ, शिंगोणी आदी ठिकाणी मिळून दोन लाख ११ हजार वृक्षांची लागवड होणार आहे. पंढरपुरात मेंढापूर, बार्डी आदी भागांत मिळून ९२ हजार वृक्षांची लागवड होणार आहे. दक्षिण सोलापुरात २४ हजार वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sairat movie team invited for green maharashtra campaign

ताज्या बातम्या