अलिबाग – रायगड जिल्ह्यात आजपासून साखरचौथीच्या गणेशोत्सवाची सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात ४२४ ठिकाणी सार्वजिनिक तर ६७० ठिकाणी खाजगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या गणेशोत्सवाचा प्रस्त झपाट्याने वाढत चालले असल्याचे यानिमित्याने दिसून येत आहे.
कोकणात घराघरात गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव फारसा साजरा केला जात नव्हता. पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी उत्तर कोकणात अलिकडच्या काळात साखरचौथीच्या गणेशोत्सवांचे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. भाद्रपद महिन्यातील मुख्य गणेशोत्सव संपल्यावर वद्य चतुर्थीला या गणेशोत्सवाचे आयोजन केले जाऊ लागले आहे. कुठे दिड दिवस कुठे तीन दिवस तर कुठे पाच दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जातो.
रस्त्या लगत मोठे सभामंडप, आकर्षक रोषणाई, भव्यदिव्य विसर्जन मिरवणूका, सांस्कृतीक कार्यक्रम हि या गणेशोत्सवाची ओळख बनली आहे. कुठलेही धार्मिक अधिष्ठान नसतांना केवळ सामाजिक अधिष्ठानाच्या जोरावर या गणेशोत्सवाला साजरा करण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात साखरचौथी गणेशोत्सव मंडळांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. .
प्रामुख्याने अलिबाग, पेण, पनवेल, उरण, रोहा या परीसरात साखऱचौथीचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यात पेण तालुक्यातील गणपतींचे प्रमाण अधिक असते. या गणेशोत्सवाला गणपती बनवणाऱ्या मुर्तीकारांचा उत्सव असेही संबोधले जाते. पेण मध्ये वर्षभर गणपती बनवण्याचे काम सुरु असते. वर्षभरात या परीसरातून जवळपास ४० लाख गणेशमुर्ती बनवल्या जातात. भाद्रपद महीन्यातील गणेशोत्ससाठी त्या देशाविदेशात पाठवल्या जातात. त्यामुळे गणपती व्यवसायिकांना आपल्या घरी हा गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यामुळे वद्य चतुर्थीला हे मुर्तीकार आपल्या घरी गणपती बसवतात. या गणपतीच्या विसर्जनानंतर पुढील वर्षासाठी गणेश मुर्ती बनवण्याचे काम सुरु केले जाते. उत्तर कोकणात या गणपतीला साखरचौथीचा तर तळ कोकणातील काही भागात याला गौरा गणपती असे संबोधले जाते.
रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत मंगळवारी ४२४ सार्वजनिक आणि ६७० घरगुतीसाखरचौथीच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या निमित्याने विवीध धार्मिक, सांस्कृतीक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
