अहिल्यानगर:- महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ तसेच संकटग्रस्त महिलांच्या तात्काळ मदतीसाठी शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘वन स्टॉप सेंटर’च्या (सखी केंद्र) माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४११ महिलांना विविध प्रकारचे संरक्षण आणि साहाय्य देण्यात आले आहे. या केंद्राच्या प्रशासक शबाना शेख यांनी ही माहिती दिली.
पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने महिला व बाल विकास विभाग अंतर्गत हे ‘सखी केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्य, कायदेशीर सल्ला, तज्ज्ञांकडून समुपदेशन, तसेच तात्पुरती निवास व्यवस्था आदीचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर लगेचच मुख्यद्वाराच्या बाजूला या केंद्राचे कार्यालय आहे.
कौटुंबिक वाद, छळ व मानसिक ताण यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून तज्ज्ञ समुपदेशकांकडून मार्गदर्शन दिले जात असल्याने अनेक महिलांना आत्मविश्वासाने जगण्यासाठी नवी उभारी मिळत आहे. यासोबतच महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून उपक्रमही राबवले जात आहेत. शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागांत विशेष मोहिमा आयोजित करून महिलांना कायदेशीर हक्क, हेल्पलाइन क्रमांक आणि उपलब्ध शासकीय सेवांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून दिली जाते.
संकटात सापडलेल्या महिलांसाठी हे केंद्र अहोरात्र (२४ तास) कार्यरत असून, तातडीच्या परिस्थितीत महिलांनी १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती शेख यांनी केले आहे. या केंद्रामार्फत महिलांना तात्काळ वैद्यकीय मदत आणि पोलीस साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच, मोफत कायदेशीर सल्ला देऊन तक्रार नोंदणीस मदत केली जाते. मानसिक ताणातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार व तज्ज्ञांकडून समुपदेशनाची सुविधा दिली जाते.
याशिवाय, गरज भासल्यास महिलांसाठी तात्पुरती सुरक्षित निवास व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली जाते. या सुविधांचा केंद्र सुरू झाल्यापासून आजपर्यंत १४११ महिलांना सहाय्य मिळाल्याची माहिती प्रशासक शबाना शेख यांनी दिली.महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमातून जिल्ह्यातील महिलांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यास उपयोग झाला आहे. वेळप्रसंगी केंद्राच्या माध्यमातून संकटग्रस्त महिलांना त्यांच्या घरी जाऊनही मदतीचा हात पोहोचवला जातो.
