दारू, ताडी, गुटख्याची लहान मुलांना विक्री ; सोलापूरमध्ये बाल न्याय संरक्षण कायद्याचे उल्लंघन

यंत्रमाग आणि विडी कारखाने मोठय़ा प्रमाणावर असलेल्या सोलापूर शहरात झोपडपट्टय़ांची संख्या जास्त आहे.

एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : यंत्रमाग आणि विडी कारखाने मोठय़ा प्रमाणावर असलेल्या सोलापूर शहरात झोपडपट्टय़ांची संख्या जास्त आहे. गरीब, श्रमिकांच्या अशा झोपडपट्टय़ांशी साहजिकच हातभट्टी दारू, ताडी व अन्य अवैध धंद्यांचे समीकरण जुळलेले आहे. बालकामगारांचाही प्रश्न आहे. परंतु अलीकडे लहान अल्पवयीन मुले स्वत: दारू, ताडीसारख्या व्यसनांमध्ये अडकताना दिसून येतात. दुर्दैवाने या सामाजिक प्रश्नाकडे समाज, पालक, शिक्षक असे कोणीही गांभीर्याने लक्ष देण्यासाठी पुढे येत नाहीत. लहान मुलांना हातभट्टी दारू, भेसळयुक्त कृत्रिम ताडीसह गुटखा घातक नशिले पदार्थ सर्रासपणे विकले जातात. हे सारे प्रकार जणू नित्याचे असल्यामुळे समाज हे सारे उघडय़ा डोळय़ांनी बघूनही त्याविषयी कोणालाही आक्षेपार्ह असे काही वाटत नाही.

शहराचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या निदर्शनास ही बाब आढळून आली असून पोलिसांनी विविध सहा ठिकाणी घातलेल्या धाडींमध्ये लहान अल्पवयीन मुले हातभट्टी दारू, ताडी, गुटखा स्वत: खरेदी करताना सापडली. शाळकरी किंवा शाळाबाह्य मुले दारू, ताडी खरेदी करण्यासाठी गुत्त्यांवर येतात. तेव्हा संबंधित विक्रेत्यांकडून कोणताही आड पडदा न ठेवता अशा मुलांना नशिले पदार्थ विकले जातात. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या माध्यमातून झालेल्या कारवाई सत्रात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत असल्याची बाब समोर आली आहे.

कन्ना चौकातील एका घरात बेकायदा ताडी अल्पवयीन मुलांना विक्री केली जात असताना शिवाजी विठ्ठल माने (वय ६८, रा. रविवार पेठ, सोलापूर) यास पकडण्यात आले. विठ्ठल हणमंतु पिंडापल्ली हा मूळ मालक असल्याचे स्पष्ट झाले. हैदराबाद रस्त्यावर जुन्या विडी घरकूल परिसरात अल्पवयीन मुलांना हातभट्टी दारू विकताना राजेंद्र नरसय्या गोसकी (वय ५९) व गुरू राठोड हे सापडले. एमआयडीसी, जोडभावी पेठ, फौजदार चावडी आदी पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारच्या सहा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

अल्पवयीन मुले स्वत:च्या व्यसनासाठी दारू, ताडी खरेदी करतात आणि त्यांना नशेल्या पदार्थ सहजपणे उपलब्ध होतात, ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त बैजल यांनी ही कारवाईही मोहीम राबविताना काही अल्पवयीन लहान मुलांना तोतया ग्राहक म्हणून पाठविले होते. लहान अल्पवयीन मुलांच्या हातात पाठय़पुस्तकांऐवजी हातभट्टी दारू, ताडीच्या पिशव्या, गुटखा पुडय़ा सहजपणे उपलब्ध होत होतात. हा सामाजिक प्रश्न अस्वस्थ करणारा ठरला आहे.

लहान मुलांना नशेल्या पदार्थाची विक्री करण्याचे प्रकार गंभीर असल्याचे नमूद करीत, पोलीस आयुक्त बैजल या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष देताना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. परंतु या प्रश्नावर समाज, पालक, शिक्षक यांनी गाफील राहता कामा नये, असेही मत त्यांनी मांडले आहे. यातील आणखी आक्षेपार्ह आणि गंभीर बाब अशी की लहान मुलांसह सर्वाना विकली जाणारी ताडी (स्थानिक भाषेत शिंदी) ही विषारी अशा हायड्रोक्लोराईड या रासायनिक पदार्थापासून बनविली जाते. या भेसळयुक्त विषारी ताडीने आतापर्यंत अनेक जीवांचे बळी घेतले आहेत. ताडी उत्पादन आणि विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायदेशीर नियंत्रण असते. परंतु सोलापूर जिल्हा व आसपासच्या भागात अस्तित्वात असलेली शिंदी झाडांची बने आणि प्रत्यक्षात उत्पादित होणारी आणि विकली जाणारी शिंदी यात प्रचंड तफावत आहे. शासनाला दरवर्षी कोटय़वधींचा महसूल मिळतो म्हणून अशा भेसळयुक्त शिंदीचे उत्पादन आणि विक्रीकडे शासकीय यंत्रणेचे सहसा दुर्लक्षच असते. हायड्रोक्लोराईड रासायनिक पावडर मिळवून तयार होणारे ताडी प्राशन केल्यानंतर नशा चढते. परंतु नशेत तोल गेल्यानंतर खाली कोसळले आणि डोक्याला साधा मुक्का मार बसला तरी त्यात माणूस क्षणात बेशुद्ध होतो आणि मृत्युमुखी पडतो. शवविच्छेदनानंतर रासायनिक पृथक्करणाचा (व्हिसेरा) अहवाल सहा महिन्यांपर्यंत मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकरणांचा खोलवर तपास होत नाही. साहजिकच ताडी विक्रेते कारवाईच्या कचाटय़ात सहसा सापडत नाहीत. अनेक वेळा यंत्रणाही त्यात सामील असते. तथापि, महसुलाचा विचार न करता तीन वर्षांपूर्वी शासनाने ताडी विक्री केंद्रे बंद केली आहेत. ताडीची अधिकृतपणे विक्री होत नसली तरी प्रत्यक्षात झोपडपट्टय़ांमध्ये ही भेसळयुक्त ताडी सर्रासपणे विकली जाते. ताडीबरोबरच आता ‘फ्रूट बिअर’च्या नावाखाली नशिल्या पदार्थाची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे.

यापूर्वी तत्कालीन सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक एस. एम. मुश्रीफ यांच्या कार्यकाळात ‘३६ जनार्दन काढा’ या नावाने आयुर्वेद काढा म्हणून सरळ मादक अमली पदार्थाची विक्री व्हायची. मुश्रीफ यांनी त्यावर कठोर कारवाई करून पायबंद घातला होता. या अमली पदार्थाची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या जयंत श्रीगांधी नावाच्या तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तीला अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याखाली (एनडीपीएस) कठोर शिक्षा सुनावण्यात आली होती. आता ‘३७ जनार्दन काढा’ अस्तित्वात नाही. परंतु त्याची जागा ‘फ्रूट बिअर’ने घेतली आहे. अगदी किराणा दुकानातून सुद्धा ‘फ्रूट बिअर’ विकली जाते. लहान मुलांनाही त्याची विक्री होते. ही बाब पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.

यंत्रमाग, विडी उद्योगांशी संबंधित कामगार आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सामाजिक प्रश्नांचा अभ्यास असलेले प्रा. विलास बेत यांनी शहरातील पूर्व भागात प्रामुख्याने तेलुगु भाषक कामगारांची संख्या मोठी आहे. मागील तीन-चार पिढय़ा विणकर तेलुगु भाषक समाज राहतो. मालकांच्या घरातील कामे करताना कामगारांना मालक मंडळी दारू, ताडी आणायला सांगतात. घरात मित्रमंडळी व नातेवाईकांसह दारू, ताडी पिण्यासाठी कोणताही सुख-दु:खाचा प्रसंग पुरेसा असतो.

मालकांच्या घरात कामे करण्यासाठी कामगारांची लहान मुलेही जातात. त्यांनाही दारू विकत आणायला पाठविले जाते. मालकाप्रमाणे कामगारांकडूनही घरात स्वत:च्या मुलांना नशिले पदार्थ विकत आणण्यासाठी धाडले जाते. या साऱ्या गोष्टी अल्पवयीन मुलांसमोरच घडत असल्यामुळे त्यातूनच ही मुलेसुद्धा व्यसनाकडे वळतात.

लहान मुलांना नशिले पदार्थ मिळणे ही बाब अतिशय संवेदनशील आणि मनाला अस्वस्थ करणारी आहे. मालकांकडून कामगार वा त्यांच्या मुलांना दारू, ताडीसारखे नशिले पदार्थ मागविले जातात. मुलांसमोरच या गोष्टी घडत असल्याने ही मुलेसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतात. याविषयी मालक, पालक आणि संबंधितांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलेही व्यसनांना बळी पडत आहेत. शिक्षकांनी शाळेत मुलांना मार्गदर्शन करताना त्यापासून परावृत्त केले तरच भावी पिढी वाचेल.

प्रा. विलास बेत, सामाजिक घडामोडींचे विश्लेषक

अल्पवयीन मुलांना नशिले पदार्थ विकणे ही बाब गंभीर आहे. यातून बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियमाचा भंग होतो. त्यावर सातत्याने परिणामकारक कारवाई होईल. दुसरीकडे सामाजिक प्रश्न म्हणून याकडे संवेदनशीलता दाखवायला हवी. अशा लहान अल्पवयीन मुलांना व्यसनापासून दूर करण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी पुढे येणे आवश्यक वाटते.

हरीश बैजल, पोलीस आयुक्त, सोलापूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sale liquor gutkha children ysh

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या