राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘संघ प्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज’ या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पहिल्या दिवशी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान संघाच्या कार्यक्रमात सलमान खानच्या हजेरीमुळे याची राजकीय वर्तुळात देखील चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. या व्याख्यानमालेत अभिनेता सलमान खान याच्यासह रणबीर कपूर, तसेच अनेक प्रमुख शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि कलाकारांसह ९०० हून अधिक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या व्याख्यानादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघाची स्थापना, त्याची वाटचाल, स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. तसेच मातृभाषेतून शिक्षण, हिंदुत्व, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा विविध विषयांवर देखील दोन सत्रांमध्ये झालेल्या भाषणात त्यांचे मत मांडले.
जागतिक पातळीवर भारताची पत आता वाढली आहे. अशा वेळी आंतरराष्ट्रीय व्यवहार हा कोणाच्या दबावाखाली येऊन करू नये तसेच व्यापार करार हे भारताच्या मर्जीनुसार व्हावेत, असा सल्ला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी सरकारला दिला. भारताने महाशक्ती म्हणून नव्हे तर विश्वगुरूची भूमिका वठवावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अमेरिका आणि युरोपीय महासंघाशी झालेल्या व्यापार करारांवरून सध्या विविध चर्चा सुरू आहेत. याबद्दलही यावेळी मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. या झालेल्या करारांचा थेट उल्लेख टाळत करार हे भारताच्या अटीनुसार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर काही व्यवहार हे अपरिहार्य असतात. पण अशा व्यवहारांमध्येही कोणाच्या दबावाखाली येऊ नये, असे खडे बोलही सुनावले.
अनेक विदेशी वस्तूंपेक्षा भारतीय वस्तू चांगल्या आहेत. पण आपण विदेशी वस्तूंचाच वापर करतो. विदेशी वस्तूंशिवाय आपले व्यवहार होऊ शकतात. आपल्या देशाचा रोजगार कसा वाढेल याचा विचार करून वस्तू खरेदी करण्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. त्यातून भारतीय उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल, असेही भागवत म्हणाले.
संजय राऊतांचा भागवतांना सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान उपस्थित राहिल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊतांनी भाष्य केले आहे. हिंदू-मुस्लिम राजकारणावरून टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “सलमान खान व्यासपीठावर होते असं मला कळलं. हे सलमान खानचं स्वागत होतं? एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे? फक्त सलमान खान या नटाला व्यासपीठावर आमंत्रण होतं की संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. कारण ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे त्यामध्ये संघही सामील आहे.”

