राहाता : आषाढी वारीसाठी पंढरपूरपर्यंत पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पैशांची गरज लागल्यास कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेने ‘वारकरी बँक’, अशी अभिनव योजना सुरू केली आहे. या वारकरी बँकेमुळे वारकऱ्यांच्या पैशांना सुरक्षितता मिळणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.
कोपरगाव येथील समता नागरी पतसंस्थेने पंढरपूरच्या वारीत, दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी समता सहकारी वारकरी बँक या अभिनव संकल्पनेद्वारे वारकऱ्यांच्या पैशांची आणि इतर आवश्यक वस्तूंची जबाबदारी स्वेच्छेने घेतली आहे. हा उपक्रम आळंदीपासून पंढरपूरपर्यंत सुरू असून, दिंडी क्रमांक ४३ मध्ये सहभागी विष्णू महाराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. या अभिनव सामाजिक उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुरक्षिततेचा विश्वास दिसत असल्याचे कोयटे यांनी सांगितले.
विष्णू महाराज केंद्रे यांनी वारकऱ्यांच्या वस्तू व पैशांची जबाबदारी कोणीतरी घ्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत समता पतसंस्थेने पंढरपूरच्या मार्गावर वारकऱ्यांना अत्यावश्यक वेळेस त्यांच्या जमा केलेल्या वस्तू आणि रक्कम दिली जाईल, अशी सुविधा सुरू केली आहे. या सेवेसाठी कोणताही मोबदला घेतला जाणार नाही. उलट, एक दिवस जरी पैसे जमा राहिले, तरी ८ टक्के व्याजासह ती रक्कम परत दिली जात असल्याचे काका कोयटे यांनी सांगितले. या उपक्रमाचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भेट देऊन कौतुक केले आहे. याचबरोबर, वारकऱ्यांना ऊन, पाऊस व वाऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनने मोफत रेनकोट वाटप करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, कार्याध्यक्ष सुधीर डागा, उपाध्यक्ष चांगदेव शिरोडे यांनी दिली.