राहाता: समता पतसंस्थेच्या येथील शाखेत शंभर बनावट खाते प्रकरणात पोलिसांच्या शिर्डी एसआयटीने मोठी कारवाई करत, पतसंस्थेच्या राहाता शाखेचा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला अटक केली. त्याला आज, मंगळवारी न्यायालयाने ४ दिवसांची (दि. ७) पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती एसआयटीचे तपास अधिकारी तथा शिर्डीचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात याच्या चौकशीतून समोर आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. राहाता येथील समता पतसंस्थेत तब्बल ५७ व्यक्तींच्या नावावर १०२ बनावट खाती उघडण्यात आली होती. विशेष म्हणजे या सर्व खात्यांमध्ये भोंदू अशोक खरात याचेच नाव वारसदार म्हणून नोंदविण्यात आले होते. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
शिर्डी पोलिसांनी संबंधित खातेदारांची चौकशी केली असता, सर्वांनी आपण कोणतेही खाते उघडले नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे ही खाती उघडण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा तपास सुरू आहे. बनावट खाती उघडण्यासाठी पतसंस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका काय होती, याचाही शोध घेतला जात आहे.
या संर्दभात पतसंसंथेत १०२ खाते उघडतांना सह्या कोणी केल्या, या उघडलेल्या खात्यांवर रोख रक्कमा कोणी भरल्या, नंतर पैसे काढतांना खातेदारांच्या सह्या कोणी केल्या असा युक्तीवाद तपासी अधिकारी भारती यांनी न्यायालयासमोर केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन अधिक तपास करण्यासाठी व्यवस्थापक मिलिंद बनकर याला ४ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली.
दरम्यान, मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर राहाता शाखेचा व्यवस्थापक मिलिंद बनकरला अटक करण्यात आल्याने तो चौकशीत काय माहिती देतो त्यानंतरच आणखी काही जणांवरही कारवाई होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. समता पतसंस्थेतील या कथित आर्थिक गैरव्यवहारात आणखी कोणती नवी माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी दिनेश परब यांनी राहाता पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे.
