भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे. लाड यांच्या या विधानानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपाने आता प्रायश्चित्त करण्याची गरज आहे, अशा शब्दांत टीका केली आहे. तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील लाड यांचे वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे आहे, असे म्हणत आक्रमक पवित्रा धारण केला आहे. तसेच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानवरही आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. त्यांनी जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी रोखठोक भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानानंतर अमोल मिटकरींचा हल्लाबोल, म्हणाले “आता नाक रगडून…”

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढा अशी भूमिका सर्वांत अगोदर मी घेतलेली आहे. आम्ही वेळोवेळी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलेले आहे. ३० जिल्ह्यांत आम्ही आंदोलन केले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कोश्यारींना हटवण्याचे निवेदन दिले आहे. जेव्हा कोश्यारी पुण्यात आले, तेव्हा त्यांना काळे झेंडे स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच दाखवलेले आहेत. जोपर्यंत कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवू,” असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

“राज्यपाल वेळोवेळी अपशब्द काढतात. यावर भाजपाचे सरकार कशे शांत राहू शकते. कोश्यारी यांना महाराष्ट्रातून काढल्यानंतरच भाजपाचे शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम निश्चित होणार आहे. राज्यपालांविषयी उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे वेगळे नाहीत. आम्ही आंदोलनं वेगळ्या पद्धतीने करत आहोत. मात्र आम्ही दोघे एकच आहोत,” असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

हेही वाचा >>> गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…

“भाजपा एकीकडे शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, असे म्हणते. आम्ही राजकारण आणि समाजकारण शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच करतो, असा दावा भाजपा पक्ष करतो. मग राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अद्याप महाराष्ट्रात कसे आहेत. भाजपाची ही दुटप्पी भूमिका आहे. भाजपा रस्त्यावर का येत नाही,” असा खोचक सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

“राज्यपालांनी जे विधान केले आहे, त्याची सर्व माहिती आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवली, असे देवेंद्र फडणवीस सांगतात. हे काय उत्तर आहे का. त्यांची काही जबाबदारी नाही का? सरकारमध्ये असले म्हणजे बोलायचं नाही का? कोश्यारी यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

हेही वाचा >>> भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…”

“राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम कशाला हवे. त्यांना भेटून काय होणार आहे. आम्ही पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पत्र दिलेले आहे. आता कोश्यारी यांना राज्यपाल पदावर किती दिवस ठेवायचे हे त्यांनीच ठरवले पाहिजे. महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरलेलीच आहे. जोपर्यंत कोश्यारी यांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू,” असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji chhatrapati demand resignation of bhagat singh koshyari criticizes devendra fadnavis and eknath shinde prd
First published on: 04-12-2022 at 14:30 IST