रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, “निधी नाही” हा केवळ बहाणा आहे; प्रत्यक्षात राजकीय इच्छाशक्तीचाच अभाव आहे, असा घणाघाती आरोप हर्षवर्धन सकपाळ यांनी केला.
“घोषणांमध्ये स्मारक भव्य-दिव्य असते; पण जमिनीवर फक्त शून्यच दिसते,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
कसबा येथे संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. स्थानिकांच्या भावना तीव्र असताना देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. “जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवून वेळ मारून नेण्याची सवय सत्ताधाऱ्यांनी सोडावी. दिलेला शब्द पाळा आणि काम तातडीने सुरू करा,” असा इशारा सकपाळ यांनी दिला.
संभाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचे विचार आणि त्याग पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही केवळ औपचारिकता नसून ऐतिहासिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. “पालकमंत्री आणि इतर नेते वारंवार घोषणा करतात, फोटोसेशन करतात; पण फाइल्स पुढे सरकत नाहीत. जनतेत रोष वाढत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या घोषणेचा दाखला देत सकपाळ म्हणाले, “भव्य स्मारकाची घोषणा झाली; पण आजही ते पूर्णत्वास आलेले नाही. कसबा स्मारकाचीही तीच गत होऊ देऊ नका.”
मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि अनेक मान्यवरांनी कसबा येथे भेट देऊन विकासाच्या गप्पा मारल्या; मात्र प्रत्यक्षात विकासाचा गाडा रुळावर आलेला दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. “निधीची कमतरता नाही; कमतरता आहे ती राजकीय धैर्याची,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
या बैठकीला रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, सोनलक्ष्मी घाग, काशिनाथ वाजे, फैज पाटणकर, मुरलीधर बोरसुतकर, चंद्रकांत कदम आदी उपस्थित होते. कसबा स्मारकाचा मुद्दा आता केवळ स्थानिक न राहता व्यापक जनआंदोलनाचे रूप घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
