खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात  श्वेता दीपक सुरवसे (वय २३) हिचं अपघाती निधन झालं. रील काढण्याच्या नादात गाडी दरीत कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. याप्रकरणी तिला चारचाकी शिकवणाऱ्या तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा अपघात नसून सुनियोजित घातपात असल्याचा संशय श्वेताच्या मावस बहिणीने व्यक्त केला आहे. तिने यासंदर्भातील माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“ती माझ्या मावशीची लहान मुलगी आहे. तिचं अपघाती निधन झाल्यांचं सांगितलं जातंय. पण तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकही रील नाहीय. हा जो मुलगा आहे जो स्वतःला तिचा मित्र म्हणवतो. तो तिचा मित्र होता की बॉयफ्रेंड हे माहीत नाही. ‘मला आज सुट्टी आहे, मी मित्राकडे जातेय’, एवढंच ती सांगून निघून गेली. पण ती कुठे जातेय, हे तिने सांगितलं नाही. त्यानंतर संध्याकाळी माझ्या भावाला फोन आला की तिचा अपघात झाला असून तिचा पाय तुटला आहे. त्वरीत पोलीस ठाण्यात या. इथे आल्यानंतर आम्हाला खूप वेळाने तिचं निधन झाल्याचं कळवलं”, असं श्वेताची मावस बहिण प्रियंका यादव हिने दिली.

“जवळपास पाच तासांनी तिच्या मृत्यूची बातमी आम्हाला दिली. तिच्या शेजारा-पाजाऱ्यांना आधी बोलावण्यात आलं. आधी त्यांना सांगितलं गेलं. मग त्यांच्याकडून माझ्या भावाला तिच्या निधनाविषयी कळलं. यानंतर जेव्हा रील करताना एका मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी न्युज चॅनेलवर आली तेव्हा त्याला याची खात्री झाली. गुन्हा दाखल केला जात नव्हता, खूप जबरदस्ती करून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

गाडी शिकवायला ३०-४० किमी लांब का नेलं?

“ती रील बनवायला गेली होती तर तो मुलगा तिला एकटीलाच का घेऊन गेला? तेही घरापासून ३० ते ४० किमी अंतरावर का घेऊन गेला? तिने आतापर्यंत एकही रील बनवली नाही, मग आजच का तिला रील बनवायची होती? याआधी तिने कधीही रील बनवली नाही. ३० ते ४० किमी लांब येऊन प्लानिंग करून त्याने तिची हत्या केली आहे, हे आम्हाला माहितेय. आम्हाला ज्या पद्धतीने माहितेय त्यानुसार ही सुनियोजित हत्याच आहे”, असा गंभीर आरोपही तिने केला आहे.

क्लच दाब असं का म्हणाला तो?

“तिला गाडीही चालवता येत नाही. त्यामुळे टेकडीवर जाऊन तिला गाडी शिकवण्याची गरज काय होती? त्यामुळे आम्हाल त्याचं हे प्लानिंग वाटतंय. तिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही. आणि जो तिला वाहन शिकवत होता त्याच्याकडे वाहन शिकवण्याचा परवाना नाही. रिर्वस गेरमध्ये गाडी कोण शिकवतं? त्याला गाडीच शिकवायची होती तर त्याने गाडीत तिच्या शेजारी बसायला हवं होतं. जेणेकरून त्याने तिला काहीतरी मदत केली असती”, असंही ती म्हणाले. “तो व्हिडिओत तिला क्लच दाब असं का सांगतोय. तो तिला घेऊन गेला नसता तर आज आमची बहीण जिवंत असती”, अशी खंतही तिने यावेळी बोलून दाखवली.

मित्राविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, भारतीय दंड संहिता कलम ३०४ (अ) अंतर्गत श्वेताचा कथित मित्र सूरज मुळे याच्याविरोधात गुन्हा दाखलझाला. निष्काळजीपणे मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली मुळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खुलताबाद पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.