शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आहे. या राजकीय घडामोडींवरून विधानपरिषद बरखास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या राजकीय घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला राज्यसभेत पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर हा खेळखंडोबा झालाच नसता’, असे मत संभाजी राजेंनी व्यक्त केलं आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला संभाजीराजे उपस्थितीत होते. त्यावेळेस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

मला त्या राजकारणात पडायचं नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंधरा दिवसात जे घडलं आहे ते बरोबर नाही. मला त्या राजकारणात पडायचं नाही. मात्र, सरकारने शेतकरी आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन काम करावं एवढीच माझी इच्छा आहे, असे संभाजी राजे म्हणाले. तसेच कुठे जायचं कुठे नाही हा शिवसेनेचा वैयक्तिक अधिकार आहे. ज्या कोणाचे सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कष्टकऱ्यांचे, समाजाचे प्रश्न सोडवले पाहीजे. या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राचं नाव हे देशभर कसं पोहोचवता येईल. याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचं असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.

पाठिंबा न मिळाल्यामुळे राज्यसभेतून माघार

राज्यसभा निवडणुकीवेळी संभाजीराजेंनी शिवसेनेचा पाठिंबा मागितला होता. मात्र, अपक्ष म्हणून नाही तर शिवसेनेत प्रवेश करा, शिवबंधन बांधा तरच पाठिंबा देऊ, अशी भुमिका शिवसेनेने घेतली होती. परिणामी संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे नेते संजय पवार यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी संजय पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला डळमळीत झाली आहे.