गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेनं पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला नकार दिला. शिवसेनेकडून कोल्हापूरच्या संजय पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मला वाईट वाटतंय, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला”

“मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असं ते म्हणाले.

घोडेबाजार टाळण्यासाठी घेतला निर्णय

राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “ज्या आमदारांनी ड्राफ्टवर सह्या केल्या, त्या आमदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी. शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच. पण मला कल्पना आहे की यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे”, असं संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

संभाजीराजे भोसलेंनी ‘स्वराज्य’ संघटनेची केली घोषणा; म्हणाले, “पुढे राजकीय पक्ष झालाच तर…!”

अपक्ष निवडणूक लढवणार होते संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपासून भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत अपक्ष म्हणून आपल्याला सर्व पक्षांनी पुढाकार घेऊन पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेनं आपलाच उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार म्हणून संभाजीराजेंनी निवडणूक लढवावी, अशी अट त्यांना घालण्यात आली होती. मात्र, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय अंतिम असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajiraje chhatrapati says wont fight rajyasabha election after shivsena pmw
First published on: 27-05-2022 at 11:28 IST