प्रशांत देशमुख, वर्धा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हय़ाचे सव्रेसर्वा माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचे चिरंजीव व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष समीर देशमुख यांचा उद्या मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना प्रवेश होत असल्याचे समजते. हा निर्णय विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले समीर देशमुख यांनी शिवसेनेतील प्रवेशास दुजोरा देतानाच उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी चर्चा झाल्याचे मान्य केले. जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेसला सातत्याने अपयश येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर राजकीय भविष्य उज्ज्वल करण्यासाठी समीर देशमुख यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सातत्याने ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. बुडीत निघालेल्या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी सहकार गटाचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. देशमुखांनी शब्द टाकल्यावर गडकरींनी केंद्राकडून व राज्याकडून जिल्हा बँकेला पॅकेज मिळवून दिले होते.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सेना प्रवेशाचा निर्णय केवळ समीर देशमुख यांनी घेतला आहे. देवळी मतदारसंघातून लढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीच आहे. पक्ष निश्चित नव्हता. कारण भाजप व सेनेच्या जागा वाटपात देवळीची जागा सेनेच्या वाटय़ाला येण्याची चर्चा आहे. सेनेतर्फे  देवळीतून लढणार काय, या प्रश्नावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.