राहाता: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर कोपरगाव – सिन्नर दरम्यान, नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डिझेल टँकरने पाठीमागून मालमोटारीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या.डिझेल टँकर (एमएच ४९ बीझेड ३१८७) हा मुंबईहून नागपूरच्या दिशेने चालला होता.

त्याने पुढे चालणाऱ्या मालमोटारीला (एमएच ०४ एफपी २००८) मागून जोराची धडक दिल्याने टँकरने पेट घेतला. हा अपघात काल, सोमवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडला. अपघात इतका भीषण होता की मालमोटार महामार्गाच्या खाली गेली. पेट घेतलेल्या टँकरमधील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. शिर्डी व सिन्नर पथकर नाक्यावरील सुरक्षा पथक तसेच महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आग विझविण्यासाठी सिन्नर तसेच समृद्धी महामार्गाच्या अग्निशामक दलाने तसेच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत, आग विझविण्याचे काम केले. अपघातामुळे जवळपास पाच ते सहा किमी. वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली व वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर अवजड व हलक्या वाहनांना वेग मर्यादेचे नियम असले तरी वेग मर्यादा नियमांचे कोणीही पालन करीत नसल्याने वारंवार या समृद्धी महामार्गावर अपघात घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले होते.

त्यानंतरकाही दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता.समृद्धी महामार्गावर वाहने येण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याचे काम आरटीओचे पथक करीत होते. परंतु आता या वाहनांची तपासणी करताना आरटीओचे पथक दिसून येत नाही. अनेक वाहनांचे टायरही खराब असतात, हवेचा दाब ही कमी असतो, परंतु याची तपासणी होत नसल्याने वाहनचालकांचे फावते आणि अतिवेगामुळे हे अपघात घडतात. समृद्धी महामार्ग झाल्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत झाली आहे. मात्र वेळेपेक्षा वाहनांची वेगमर्यादा जास्त असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. महामार्ग समृद्धी महामार्गावर सुरक्षा नियमांची पायमल्ली सातत्याने होत असल्याचे दिसून येत आहे.