राहाता: नागपुर – मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूटमार करणाऱ्या आणि डिझेल चोरी करणारी टोळी बाभळेश्वर महामार्ग पोलीस केंद्राच्या पथकाने आज, शनिवारी पहाटे पाठलाग करून उघडकीस आणली. पोलिसांनी एका संशयित दरोडेखोराला अटक केली. गुन्ह्यातील विनाक्रमांकाची मोटार, डिझेलचे कॅन, घातक शस्त्रे जप्त केली.​ पाठलाग करताना दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेकही केली.

अमोल नाना वैद्य (वय २० वर्षे, रा. कोऱ्हाळे, राहाता) असे ​अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कोपरगाव न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक ५०८ जवळ एका बंद पडलेल्या मोटारीतील प्रवाशांना दरोडेखोर लुटत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून गस्ती पथकाला मिळाली. महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर दोन वाहनांमधून पसार झाले होते. संशयित वाहन चॅनेल क्रमांक ५१० जवळ पोलीसांना आढळले.

पोलिसांना पाहताच आरोपींनी मोटार नाशिककडे पळवली. पाठलागदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या गाडीवर चालत्या वाहनातून जोरदार दगडफेक केली. त्याचवेळी आरोपींच्या साथीदारांनी विनाक्रमांक दुसऱ्या मोटारीने पोलीस वाहनाचा रस्ता अडवला. याचा फायदा घेऊन एक मोटार पसार झाली, तर मोटार ‘रॉंग साईड’ने पळून गेली.

याची माहिती मिळताच बाभळेश्वर केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना सकाळी ६.४५ वा.  एका ट्रक चालकाला ७ जणांनी मारहाण करून लुटल्याचा दूरध्वनी आला. पोलीस तिथे पोहोचले असता, त्याच दोन्ही मोटारीतील दरोडेखोरांनीच हे कृत्य केल्याचे समोर आले.​ पोलिसांच्या शोधात चॅनेल क्रमांक ५२० जवळ मोटार एका मालट्रकमधून डिझेल चोरी करताना सापडले. पोलिसांना पाहताच आरोपींनी प्रचंड वेगाने मोटार पळवली. महामार्ग पोलिसांनीही जीवाची परवा न करता पाठलाग केला.

अखेर धोत्रे शिवारात (कोपरगाव चॅनेल क्र. ५०४) आरोपींनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवत लोखंडी जाळीच्या कुंपणावरून उड्या मारून शेतात पळ काढला. पोलिसांनीही कुंपणावरून उड्या मारत एकाला पकडले, तर त्याचे ६ साथीदार पसार झाले. पोलिसांना पकडलेल्या मोटारीत डिझेलने भरलेले ११ कॅन (अंदाजे ३८५ लीटर डिझेल) जप्त केले. या कारवाईत बाभळेश्वर महामार्ग केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, अंमलदार अनिल चव्हाण, अनिल उजागरे, किरण कुर्है, आकाश पवार, नामदेव सोळंके यांच्या पथकाने सहभाग घेतला.