मुंबई: समृद्धी महामार्गावर वाढते अपघात आणि लूटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने या मार्गावर १५ पोलीस केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारे पोलीस बळ आणि त्यांच्या खर्चाला वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. हे केंद्र पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरु होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षासाठी ४२० नियमित पोलीस पदांच्या निर्मितीस गृह विभागाने मंजुरी दिली आहे.
सातशे किलोमीटर लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर वाहनांचा वेग लांबचा प्रवास आणि अपघातांच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. काही ठिकाणी लूटमारीच्या घटनांमुळेही महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेची गरज अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर नियमित पोलीस मनुष्यबळ तैनात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाला आणि त्याच्या खर्चाला गृह व वित्त विभागाने मंजुरी दिली.
नव्याने मंजूर पदांमध्ये १६ सहायक पोलीस निरीक्षक, ३२ पोलीस उपनिरीक्षक, ४८ सहायक पोलीस उपनिरीक्षक, २७६ पोलीस शिपाई आणि ४८ पोलीस शिपाई (वाहनचालक) यांचा समावेश आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे ग्रामीण या पोलीस घटकांमध्ये मनुष्यबळाचे वाटप करण्यात येणार आहे. या पदांसाठी ४३ कोटी ४७ लाख रुपये आवर्ती खर्च आणि सात कोटी ४६ लाख रुपये अनावर्ती खर्च, असा एकूण सुमारे ५० कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. या महामार्गावर सध्या कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या १९२ कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ यंत्रणेकडे परत पाठविण्यात येणार आहे. नव्या पदांवरील भरती आणि संबंधित खर्चाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रतिपूर्ती मिळविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलीस महासंचालक कार्यालयावर सोपविण्यात आली आहे.
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर वित्त विभागाच्या मान्यतेने गृह विभागाने पदनिर्मितीचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष भरती, पोलीस केंद्रांचे कार्यान्वयन आणि नियमित गस्त सुरू झाल्यानंतरच अपघात व लूटमारीच्या घटनांना आळा बसणार आहे.
